पुण्याच्या पोलीस अधीक्षकपदी अमितेश कुमार यांची नियुक्ती केल्यानंतर आता पुण्याचे जिल्हाधिकारी बदलले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुहास दिवसे यांच्या जागी डॉ. राजेश देशमुख यांची क्रीडा आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारीपदी सुहास दिवसे यांच्या नियुक्तीचे आदेश सरकारकडून काढण्यात आले आहेत. दिवसे सध्या राज्याचे क्रीडा आयुक्त म्हणून कार्यरत होते तर पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची दिवसे यांच्या जागेवर नवीन क्रीडायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणूनही दिवसे ओळखले जातात दिवसे. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे आहेत. दिवसे यांनी याआधी पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले असून त्यांनी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात पी एम आर डी एचे आयुक्त म्हणून देखील काम पाहिलेले आहे.
दुसरीकडे, पुणे शहरातील ७०० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या १४ फेब्रुवारीला होणार आहे. पाच वर्षांपासून अधिक काळ एकाच पोलिस ठाण्यात आणि विभागात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या समावेश असलेल्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. एकाच पोलिस ठाण्यात तसेच गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा आणि पोलिस मुख्यालयात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मागवली आहे. येत्या १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी पोलिस कर्मचार्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात येणार आहे.