येत्या २० फेब्रुवारीपासून पुण्यातील ओला, उबरची सेवा बंद राहणार आहे. यामुळे पुण्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले दर लागू करण्यास कंपन्या टाळाटाळ करत असल्याचा चालकांचा आरोप आहे. त्यामुळे येत्या २० फेब्रुवारीपासून पुणे येथे तीव्र निदर्शने व बेमुदत बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
येत्या २० फेब्रुवारीपासून पुणे आणि चिंचवडमधील कॅब चालक कामबंद आंदोलन करणार आहेत. त्यादिवशी सकाळी ११ वाजता संगम ब्रिज जवळ आरटीओ कार्यालयासमोर कॅब चालक एकत्रित येतील, अन् निदर्शने करणार आहेत. प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी कॅब कंपन्यांसाठी दर पत्रक जाहीर केले असून १ जानेवारी २०२४ पासून नवीन दराची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र ओला, उबर कंपन्या या दराची अद्याप अंमलबजावणी करत नाहीत. परिणामी याचा फटका कॅब चालकांना बसत आहे. नवीन दर लागू झाल्यास कॅब चालकांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ होईल, आणि वाढीव दराचा व्यवसायावर परिणाम होईल. या भीतीने कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांनी अद्याप दराची अंमलबजावणी करत नाही, असा आरोप कॅब चालकांनी केला आहे.
ओला, उबरच्या संपावर पुण्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आंदोलनात जवळपास २० हजार कॅब चालक सहभागी होणार आहेत.
पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातील पुणे पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रात काळी पिवळी टॅक्सी व वातानूकुलीत टॅक्सीच्या (कुलकॅब) भाडे दरात एक जानेवारीपासून सुधारणा करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली होती. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातील कार्यक्षेत्रात भाडे सुधारण्याच्या अनुषंगाने खटुआ समितीच्या शिफारशीनुसार तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २२ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत भाडे दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.