Pune Crime News : एका महिलेने आपल्या पोटच्या दोन मुलांची गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील दौंड येथे घडली आहे. महिलेने दोन चिमुकल्यांचा ते झोपेत असतानाच गळा दाबून हत्या केली. त्यानंतर महिलेने पतीवरही कोयत्याने वार करुन जखमी केलं. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली. दौंड पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
शनिवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून आणि सासरच्या छळाला कंटाळून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शंभू दुर्योधन मिढे (वय ०१ वर्ष) आणि पियू दुर्योधन मिढे (वय ०३ वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत. तर महिलेच्या हल्ल्यात पती दुर्योधन आबासाहेब मिढे (वय ३५) जखमी झाला असून त्याच्या मानेवर व हातावर वार करण्यात आले आहेत.
दुर्योधन मिंढे आयटी कंपनीत संगणक अभियंता आहेत. सध्या ते घरातून काम करतात. त्यांची पत्नी कोमल शिक्षित आहे. मिंढे कुटुंबीय स्वामी चिंचोली गावातील शिंदे वस्ती भागात राहायला आहेत. शनिवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास कोमलने ओढणीने पियू आणि शंभू यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर गाढ झोपेत असलेल्या दुर्योधन यांच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. दुर्योधन यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. दुर्योधन यांचे आई-वडील, भाऊ झोपेतून जागे झाले. जखमी अवस्थेतील दुर्योधन यांना तातडीने बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच दौंडचे उपविभागीय अधिकारी बापूसाहेब दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक निरीक्षक नागनाथ पाटील, उपनिरीक्षक दत्तात्रय कुंभार, सहायक फौजदार गोरख मलगुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याच्या फुकटा गावात एका महिलेने दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी मारून जीवन संपवले आहे. शशिकला पिंटू घुले (२४ रा. परसोडी जि. यवतमाळ), कविता पिंटू घुले (१.५) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. यवतमाळ जिल्ह्यातील घुले कुटुंब फुकटा गावात मेंढ्या चरण्यासाठी घेऊन आले होते.
मेंढ्या चारून आणल्यानंतर त्यांना जाळीत कोंडायच्या होत्या. मात्र मेंढ्या शेजारच्या शेतातील पिकाकडे गेल्याने पिंटूने पत्नी शशिकला हिला मेंढ्यांना हाणून आणण्यास सांगितले. मात्र, शशिकलाने याला नकार दिल्याने पिंटूने तिला मारहाण केली. यानंतर शशिकला रागाच्या भरात तिच्या मुलीसह मेंढ्या आणायला गेली. मात्र, तिने शेतात असलेल्या विहिरीत मुलीसह उडी मारुन आत्महत्या केली. लोकांनी दोघींना विहिरीतून बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. विवाहितेच्या नातेवाईकानी कुठलीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले.
संबंधित बातम्या