pune hinjewadi it companies news : पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथील आयटी पार्कमुळे पुण्याची जागतिक पातळीवर ओळख झाली आहे. येथील आयटी कंपन्यामुळे या परिसराचा विकास झाला. मात्र, या विकसाला आता ट्रॅफिक जॅमचे ग्रहण लागले आहे. या समस्येमुळे येथील अनेक आयटी कंपन्यांनी त्यांचा बोरा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर स्थलांतर केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तब्बल ३७ कंपन्या राज्याबाहेर गेल्या असून आणखी काही कंपन्या पुण्याबाहेर जाण्याच्या विचारात आहेत. या घटनेची दखल उद्धव ठाकरे यांनी घेतली असून ट्विट करत शिंदे सरकारच्या धोरणावर टीका केली आहे.
पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात पुण्यात मेट्रोची कामे सुरू असल्याने त्यात आणखी भर पडली आहे. पुण्यात हींजवडी येथे कंपनीत जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे अनेक कर्मचारी हे कंपनीत वेळेवर पोहोचू शकत नाही. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम देखील बंद केले आहे. यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये इन्फोसीस, विप्रो, टाटा, महिंद्रा यासारख्या मोठ्या कंपन्या आहेत. या ठिकाणी हजारोच्या संख्येने तरुण काम करतात. मात्र, हे कर्मचारी वाहतूक कोंडीत अडकत असल्याने कंपन्यांचे नुकसान होत आहे. पावसाळ्यात वाहतूक कोंडीची समस्या तर आणखी गंभीर होते. याच वाहतूक कोंडीला वैतागून ३७ कंपन्या राज्याबाहेर स्थलांतरीत झाल्या आहेत. तर आणखी काही कंपन्या या बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने दिली आहे.
या ठिकाणी तब्बल १५० कंपन्या असून ५ लाख लोक येथे काम करतात. हिंजवडीत परिसरात १ लाख पेक्षा अधिक कार आणि इतर वाहने धावतात. या गाड्या वाहतूक कोंडीत अडकतात. १ किलोमीटर अंतर कापण्यासाठी तासभर लागत असल्याने ऑफिस नको रे बाबा त्या पेक्षा वर्क फ्रॉम होम बरे अशी अशी काम करणाऱ्यांची अवस्था झाली आहे.
हिंजवडीला जाण्यासाठी भुजबळ चौक व भूमकर चौक हाच एकमेव मार्ग आहे. येथे मेट्रोची कामे देखील सुरू आहे. हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यास वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे. मात्र, त्याला वेळ आहे.
पुण्यातील चाकण येथे ऑटोमोबाइल हब आहे. येथे देखील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. ही समस्या सोडवण्याची मागणी कंपण्यांच्या असोसिएशनने वारंवार केली आहे. मात्र, अद्याप येथेही वाहतूक कोंडी सुटली असल्याने येथील उद्योग बाहेर जाण्याच्या तयारीत आहेत.
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी या प्रकरणी पक्षाच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे. घटनाबाह्य मिंधे सरकार दिल्लीची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असताना, महाराष्ट्रातील हिंजवडी आयटी पार्कमधून तब्बल ३७ आयटी कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या आहेत. एका पाठोपाठ एक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असतानाही मिंधे सरकार हाताची घडी घालून स्वस्थ बसलंय. हा सरकारचा निव्वळ निष्क्रियपणा आहे. महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे,असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
संबंधित बातम्या