राज्यात तसेच देशभरात गर्भलिंग निदान करण्यावर बंदी आहे. यासाठी कायद्याने मोठ्या शिक्षेची तरतूद केली आहे. मात्र तरीही गर्भलिंग निदानावर नियंत्रण घालण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे गर्भलिंग निदान व गर्भपाताचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २३ वर्षीय गर्भवती महिलेचा गर्भपात केल्यानंतर अतिरक्तस्त्रावामुळे दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
गर्भलिंग निदानात मुलीचा गर्भ असल्याचे समोर आल्यानंतर विवाहितेचा गर्भपात करण्यात आला. हा गर्भपात घरीच केल्याचा आरोप मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. ऋतुजा धोत्रे (वय २३) असे मृत महिलेचे नाव आहे. फलटण तालुक्यातील पिंपरद गावात महिलेचे माहेर आहे. ही घटना २२ ते २३ सप्टेंबर दरम्यान घडली आहे. या प्रकरणी विवाहितेचा पती, सासू व सासरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पती व सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर सासू फरार आहे.
राहुल भिमराव धोत्रे (वय २८ वर्षे), लक्ष्मी भिमराव धोत्रे, भिमराव उत्तम धोत्रे (तिघे रा. वडापूरी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. तीन दिवसांपूर्वी या महिलेचा घरीच गर्भपात केल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. तिचा त्रास वाढू लागल्यानंतर माहेरच्या मंडळींना याची माहिती देण्यात आली. आज या विवाहितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेच्या माहेरच्या मंडळींनी इंदापूर पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७ मध्ये ऋतुजाचा विवाह राहुलसोबत झाला होता. लग्नानंतर एकवर्षभर सर्वकाही ठीक होते. मात्र पहिली मुलगी झाल्यानंतर मुलाच्या हव्यासापोटी तिचा छळ सुरू केला. २०२१ मध्ये तिला मुलगा झाला. मात्र त्यानंतरही तिचा छळ कमी झाला नाही. तिने याची माहिती माहेरी दिली होती. याबाबत फलटण पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. मात्र त्यानंतर ऋतुजाच्या पतीने तक्रार मागे घ्यायला लावून तिला सासरी नेले होते.
रविवारी (२२ सप्टेंबर) पती राहुल धोत्रे याने ऋतुजाच्या माहेरी फोन करून ती आजारी असल्याचे सांगितले. तिचे चुलता व चुलती तिला पाहायला गेले होते. त्यावेळी चुलती तिच्याजवळच थांबली होती. दुसऱ्या दिवशी तिला रुग्णलयात दाखल केले. ऋतुजा ही चार महिन्याची गर्भवती होती. तिचे गर्भलिंग निदान केले. मुलीचा गर्भ असल्याचे समजल्यावर सासरच्या लोकांनी इंदापूर येथील एका खासगी डॉक्टरला बोलावून राहत्या घरीच तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. तिचा गर्भपात झाल्यानंतर चार महिन्याचे स्त्रीजातीचे अर्भक राहुल धोत्रे याने जमिनीत पुरले. त्यानंतरही ऋतुचा रक्तस्त्राव होत असल्याने खाजगी डॉक्टरला घरी बोलावून ऋतुजावर उपचार केले, यातच तिचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.