Pune Murder News: पुण्यातील दिघी परिसरात चुलत भावाची हत्या केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. आरोपीच्या बहिणीचे मृत तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांच्या नात्याला घरच्यांनी विरोध दर्शवल्यानंतर आरोपीची बहीण आपले कुटुंब सोडून मयत तरुणाच्या घराजवळील परिसरात राहायला गेली. मात्र, या गोष्टी सहन न झाल्याने आरोपीने अल्पवयीन मित्राच्या मदतीने चुलत भावाची धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन यादव असे मृताचे नाव आहे. मयत सचिन यादव याचे चुलत बहिणीसोबत दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते, जे कुटुंबीयांना मान्य नव्हते. या प्रेमप्रकरणामुळे कुटुंबात तणाव वाढला होता. काही दिवसानंतर तरुणीने कुटुंब सोडून सचिन राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर दिघी येथे राहायला गेली. त्यामुळे तिच्या कुटुंबातील लोकांना आणखी राग आला. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपी गौतम त्याच्या अल्पवयीन मित्रासह दिघी येथील सचिन यादवच्या घरी गेला. यादरम्यान त्यांच्यात वादावादी झाली आणि या वादातून गौतमने सचिनवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सचिन यादव गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपी गौतम घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. काही तासांनंतर पोलिसांनी गौतमला काळा खडक आणि त्याचा साथीदाराला मावळ येथून अटक केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
संबंधित बातम्या