पुणे जिल्ह्यात एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. रात्रीच्या वेळी घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. भरदिवसा बिबट्याचं दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
वनविभागाने बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावं, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अशातच शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावात एका घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने मध्यरात्री हल्ला चढवला.
कुत्र्यावर बिबट्याने केलेल्या या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मनाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तळेगाव ढमढेरे येथील बाळासाहेब ढमढेरे यांच्या घराची राखण करणाऱ्या कुत्र्यावर बिबट्याने हा हल्ला केला. बिबट्याने हल्ला करताच कुत्रा जोरजोरात भुंकल्याने घरात झोपलेले लोक पळत बाहेर आले. त्यामुळे बिबट्याने घटनास्थळावरून जोरात धूम ठोकली आणि कुत्रा थोडक्यात बचावला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे परिसरात भीमाशेत, चौधरी वस्ती, ढमढेरे या लोकवस्तीत सलग तीन दिवस तीन ठिकाणी नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने घबराट पसरली आहे.
संबंधित बातम्या