पुण्यात एक मोठी बातमी समोर आली आहे.पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं (Pune Helicopter Crash) आहे. पुणे जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरू असून खराब हवामानामुळेच हेलिकॉप्टर कोसळलं असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आलं नाही. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह ४ जण प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
दरम्यान हेलिकॉप्टरमधील सर्व लोक सुखरूप असल्याची माहिती आहे. घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मुंबईच्या ग्लोबल कंपनीचे हे हेलिकॅाप्टर आहे. तसेच मुंबईहून विजयवाडाकडे निघालं होतं.
खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टर कोसळलं असावं, असा प्राथमिक अंदाज आहे. हेलिकॉप्टरमधील ४ जण किरकोळ जखमी झाले असून त्यातील एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचं वृत्त समजताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली. स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यात मदत केली.
अधिक माहिती अशी की, AW १३९ असं या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचं नाव आहे. हे हेलिकॉप्टर जुहू मुंबई इथून हैदराबादमार्गे विजयवाडाकडे जात होतं. ग्लोबल हेक्ट्रा या कंपनीचं हे हेलिकॉप्टर असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातून जात अचानक खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला व हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरचे कॅप्टन आनंद हे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयातमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर, दिर भाटिया, अमरदीप सिंग, एस पी राम हे जखमी झाले आहे. या तिघांची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हेलिकॉप्टर काही वेळ आकाशात घिरट्या घालत होतं त्यानंतर अचानक ते खाली कोसळले. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यामध्ये पायलट व अन्य तीन जण प्रवास करत होते. आवाज ऐकून स्थानिक आणि आजुबाजूचे लोक मदतीसाठी धावले. कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा कधीही स्फोट होऊ शकतो त्यामुळे त्याच्या जवळ न जाण्याचे पायलटने लोकांना सांगितले. घटनास्थळी जवळपास २०० ते ३०० लोक जमले होते.