पुण्यातील ससून रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीत आग लागल्यानंतर खळबळ उडाली. आगीची सूचना मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. शुक्रवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी ही आग लागली होती.
ससून रुग्णालयात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन मुख्यालयातून एक व नायडू अग्निशमन केंद्र येथून एक अशी दोन अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती.
इमारतीच्या १० व्या मजल्यावर ही आग लागली होती. आग लागल्यानंतर रुग्णालयात पळापळ सुरू झाली. आगीमुळे संपूर्ण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. ससून रुग्णालयातील नवीन इमारतीत दहाव्या मजल्यावर आग लागल्याचे समजताच अग्निशमन जवानांनी १० व्या मजल्यावर धाव घेतली. तिथे वार्डमधील शौचालयामागे असणाऱ्या डक्टमध्ये आग लागून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता.
रुग्णालयातील सुरक्षारक्षक यांनी तातडीने अग्निरोधक उपकरण वापरुन आग आटोक्यात आणल्याने मोठा धोका टळला. वार्डमधील सर्व रुग्ण सुखरुप असून आग पूर्णपणे नियंत्रित असल्याने धोका टळला आहे. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले असून कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. शौचालयात कोणीतरी धुम्रपान केल्याने आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.