Pune Pimpri Chinchwad Crime News : पुण्यात सावकाराच्या त्रासाला कंटाळून पती पत्नीने टोकाचं पाऊल उचललं आहे. आपल्या १० वर्षांच्या मुलाचा गळा दाबून त्यांची हत्या केली. यानंतर पती पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेत पती बचावला आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड येथे शुक्रवारी घडली. या प्रकरणी चार सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव हांडे आणि शीतल हांडे असे या पती पत्नीचे नाव आहे. वैभव हांडे, शीतल हांडे यांचं औषध विक्रीचं दुकान आहे. त्यानंतर त्यांनी आणखी एक दुकान टाकलं. या दुकानासाठी त्यांनी २०१७ मध्ये खासगी सावकारांकडून पहिलं कर्ज घेतलं. त्यानंतर त्याच्या मागे सावकारी जाच सुरू झाला. त्यांनी एक कर्ज फेडलं. त्यानंतर पुन्हा कर्ज घेतलं. ते फेडण्यासाठी त्यांनी आणखी एक कर्ज घेतलं. त्यांच्या डोक्यावर १३ लाखांचं कर्ज होतं. मात्र, चार सावकारांनी हांडे यांच्याकडे पैसे परत मागण्यासाठी तगादा लावला. यामुळे हांडे दाम्पत्य टेंशन मध्ये होते. अखेर शुक्रवारी सायंकाळी दोघांनी टोकाचा निर्णय घेतला. शीतल हांडे यांनी त्यांच्या मुंबईत राहणाऱ्या भावाला आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आणि दोघांनी फोन बंद केले. दोघांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. यानंतर मुलाला गळा दाबून मारलं. मुलाचा मृत्यू झाला की नाही याची शहानिशा केली. यानंतर दोघांनी गळफास घेतला.
दरम्यान, शीतल हांडे यांच्या भावाने थेट पोलिसांशी संपर्क साधला. चिखली पोलिसांनी तातडीने याची दखल घेत हांडे यांचं घर गाठलं. यावेळी शीतल यांचा मृत्यू झाल्याचे आढळले तर मुलाचा देखील मृतदेह दिसला. तर वैभव यांचा श्वास सुरु होता. त्यामुळे पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यांना शुद्ध आल्यावर त्यांनी सर्व घटना सांगितली. यानंतर मुलाची हत्या केल्याने वैभव यांच्यावर तर सावकारांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
संबंधित बातम्या