पुण्यात चाललंय काय ! वाहतूक पोलिसावर पुन्हा प्राणघातक हल्ला, फोनवर बोलण्यापासून रोखल्यावर डोक्यात मारला दगड, VIDEO
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात चाललंय काय ! वाहतूक पोलिसावर पुन्हा प्राणघातक हल्ला, फोनवर बोलण्यापासून रोखल्यावर डोक्यात मारला दगड, VIDEO

पुण्यात चाललंय काय ! वाहतूक पोलिसावर पुन्हा प्राणघातक हल्ला, फोनवर बोलण्यापासून रोखल्यावर डोक्यात मारला दगड, VIDEO

Updated Feb 08, 2025 07:53 PM IST

Pune News : पुण्यात एका व्यक्तीने वाहतूक पोलिसावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसावर हल्ला करून आरोपी घटनास्थलावरून पसार झाला. पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

वाहतूक पोलिसावर प्राणघातक हल्ला
वाहतूक पोलिसावर प्राणघातक हल्ला

पुण्यातील फुरसुंगी परिसरात एका व्यक्तीने वाहतूक पोलिसावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसावर हल्ला करून आरोपी घटनास्थलावरून पसार झाला. ही घटना भेकराईनगर चौकात गुरुवारी सायंकाळी घडली. वाहूतक पोलिसाने फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्याला रोखल्याने आरोपीने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला केला. रस्त्यात पडलेला दगड उचलून त्याने कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला. यामध्ये पोलीस हवालदार जखमी झाला आहे. विशेष म्हणजे काही दिवसाआधीही एका पोलीस कर्मचाऱ्यावर तरुणाने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला होता.

राजेश गणपत नाईक (वय ४७) असे गंभीर जखमी झालेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार राजेश नाईक फुरसुंगी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी ते भेकराईनगर चौकात वाहतुकीचे नियंत्रण करत होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या चौकातून एक व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत होता. नाईक यांनी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलू नकोस असे सांगितले. याचा राग आल्याने या व्यक्तीने नाईक यांना शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून सरळ त्यांच्या डोक्यात घातला.

या हल्ल्यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अज्ञात दुचाकी चालकाविरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार झालेल्या दुचाकी चालकाचा शोध घेतला जात आहे.

 

घटनेचा व्हिडिओ व्हायरल -

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून व्हिडीओमध्ये दिसते की, एक व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या या चालकाला जेव्हा वाहतूक पोलिसाने रोखले तेव्हा एका व्यक्तीने वाहतूक पोलिसावर हल्ला केला. पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलंय की, आता पोलिसांना पण सुरक्षिततेची गरज आहे. काय चाललंय आपल्या पुण्यात. _punethings या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माज आहे” तर काही युजर्सनी वाहतूक पोलिसांवरच टीका केली आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर