Pune varasgaon dam : पुण्यात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या हलक्या सरी सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री १० च्या सुमारास वरसगांव धरणाच्या सुरक्षा मंडळाचे कर्मचारी हे धरणाच्या भिंतीवर गस्त घालत असतांना अचानक त्यांना धरणाच्या भिंतीवर भली मोठी मगर दिसली. त्यांचा आवाज आल्याने मगरीने रस्ता बदलला. मात्र, या घटनेमुळे धरणाच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वरसगाव धरणाचे सुरक्षा मंडळाचे कर्मचारी राहूल जाधव व कुणाल बोराडे हे पाण्याची पातळी पाहण्यासाठी रात्री १० च्या सुमारास भिंतीवरून जात होते. यावेळी त्यांना धारात समोर काही तरी जात असतांना दिसले. त्यांनी त्या ठिकाणी टॉर्चचा प्रकाश टाकला असता, त्यांना तिथे भली मोठी मगर दिसली. ती मगर धरणाच्या भिंती लगत असलेल्या सुरक्षा चौकीच्या दिशेने येत होती. त्यानंतर त्यांनी मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात मगरीला पाहिले. त्यानंतर मगरीने दिशा बदलली व ती पुढे धरणाच्या भिंतीवरून जाऊ लागली.
ही बाब वनविभागच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व रेस्क्यू टीम रात्री ११ वाजता धारणावर पोहोचले. सध्या ते मगरीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाण्याची पातळी पाहण्यासाठी नेहमी जावे लागते. मात्र, धरणावर मगर आढळल्याने, कर्मचारी आता दहशीत आहे. या मगरीला तातडीने पकडण्यात यावे, व तिला पाण्यात सोडावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वरसगाव धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे धरण भरले असून धरणातून विसर्ग सोडण्यात आला होता. सध्या या परिसरात पावसाचा जोर ओसरला आहे. यामुळे धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग देखली बंद करण्यात आला आहे. खडकवासला धरणसाखळीत सध्या २६.२४ टीएमसी पाणी साठा झाला आहे.
पुण्यात पावसाचा जोर ओसरला आहे. असे असले तरी घाट विभागात पावसाचा जोर कायम आहे. आज पुण्याच्या घाट विभागात काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पुण्याला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसाची तीव्रता कमी झाल्याने सर्व धरणातील विसर्ग हा थांबवण्यात आला आहे.