Alandi girl suicide : आळंदी येथे काही दिवसांपूर्वी एका महिला पोलिस शिपायाने इंद्रायणी नदीत उडी मारून जीवन संपवलं होतं. ही घटना ताजी असतांना आज पुन्हा एका तरुणीने इंद्रायणी नदीत उडी मारून जीवन संपवलं आहे. ही घटना आज सकाळी घडली. नदी पूलावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने तो पर्यंत उडी मारली होती. ही महिला कोण आणि तिने हे पाऊल का उचललं ? याची माहिती मिळू शकली नाही. ही महिला वाहून जातानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. दरम्यान, पोलिस या महिलेचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलाशेजारील बांधण्यात आलेल्या स्कायवॉक पुलावरून या महिलेने नदीपात्रात उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली असून नदीपात्रात या महिलेचा शोध घेतला जात आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने नदीपात्रात पाण्याचा प्रवाह मोठा आहे. त्यामुळे पुलाच्या पुढच्या बाजूला शोधमोहीम राबवली जात आहे.
एका महिला पोलिसाने रविवारी रात्री आळंदी येथील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती. गेल्या तीन दिवसांपासून या महिलेचा शोध घेतला जात होता. तीन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर बुधवारी रात्री या महिलेचा मृतदेह सापडला. कॉन्स्टेबल अनुष्का केदार (वय २०) असे या आत्महत्या केलेल्या महिला शिपायाचे नाव आहे.
रविवारी सायंकाळी आळंदीच्या इंद्रायणी नदीत उडी मारून तिने जीवन संपवलं होतं. घरगुती कारणातून तिने तिचं जीवन संपवलं. एका तरुणाने तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण ते निष्फळ ठरले. अनुष्का ही पुणे ग्रामीण पोलीस दलात मुख्यालयात कार्यरत होती. नदीत उडी मारण्यापूर्वी तिने देहूफाटा येथील मित्राला फोन केला होता. पोलिसांनी तिच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास आळंदी पोलिस करत आहेत.