Sharad Pawar Press Conference Today: महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. राज्यातील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही राज्य सरकारच्यावतीने केले जात आहे. मात्र, या योजनेवरून विरोधक सरकारवर टीका करताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच लाडक्या भावांसाठी काय? असा सवाल उपस्थित केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले.
शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले. शरद पवार म्हणाले की, "यंदाच्या अर्थसंकल्पात लाडका भाऊ, लाडकी बहीण योजना मांडण्यात आली. अजित पवार आणि जयंत पाटील यांन आतापर्यंत ६ ते ७ वेळा अर्थसंकल्प मांडला. मात्र, कधीही बहीण आणि भाऊ यांच्यासाठी यांचा विचार करण्यात आला नाही. परंतु, हा सगळा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम आहे. मतदारांनी मते व्यवस्थित दिली तर बहीण आणि भाऊ सर्वांना आठवतील. मलाच एकच काळजी आहे, ती म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे."
पुढे शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्र देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे राज्य होते. मात्र, नियोजन मंडळाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राची ११ व्या क्रमांकावर घसरण झाली. महाराष्ट्राच्या डोक्यावर जवळपास ८० हजार कोटींची कर्ज आहे. एक लाख १० हजार कोटींचं कर्ज हे वेगळे आहे, आर्थिकदृष्ट्या आपले राज्य मजबूत राज्य होते. आता ते राहिले नाही. दरडोई उत्पन्न घटले आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली.
महिलेचे वय २१ ते ६५ असावे आणि त्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू नाही. इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेस पात्र नसेल. सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, मूळ निवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँकेचे पासबूक, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो आणि माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म अशी या योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी आहे.
संबंधित बातम्या