Navale Bridge: पुण्यातील नवले ब्रिजवर गेल्या काही दिवसात अपघाताची मालिकाच सुरू आहे. नवले पुलावर सातत्याने होणाऱ्या अपघातानंतर आता अनोखे बॅनर्स लावण्यात आले आहेत. रविवारी रात्री एका ट्रकने ३० हून अधिक गाड्यांना धडक दिली. त्यानंतर आतापर्यंत ४ वेळा नवले ब्रिजवर अपघात झाला. प्रवाशांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांनी सावधान, पुढे नवले ब्रिज आहे असे बोर्ड लावले आहेत.
बोर्डवर तीव्र उतार असलेला रस्ता त्यापुढे बोर्ड आणि बोर्डवर एक कावळा दाखवला आहे. तसंच सावधान, पुढे नवले ब्रिज आहे असा मजकूर आहे. जांभूळवाडी तलाव ते नऱ्हेतील सेल्फी पॉइंटपर्यंत हे बोर्ड लावण्यात आलेत. कात्रज बोगदा ते नवले पूल दरम्यान तीव्र असा उतार आहे. या उतारावर अनेकदा अवजड वाहनचालक गाडी न्यूट्रल करतात. रविवारी झालेल्या अपघातातही वाहनचालकाने ट्रक न्यूट्रल केला होता. आतापर्यंत अनेक अपघात यामुळे घडले आहेत.
भूपेंद्र मोरे यांनी म्हटलं की, नवले ब्रिज मृत्यूचा सापळा बनत चाललाय. मात्र रस्ते प्राधिकरणाकडून अद्याप यावर उपाययोजना केल्या जात नाहीयेत. मोठे अपघात झाल्यानंतर प्रशासनाला तात्पुरती जाग येते. पण ढिम्म प्रशासनाला झोपेतून जागं करण्यासाठी हे बॅनर लावण्यात आलेत. यामुळे तरी प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडूनही हालचाली केल्या जात आहेत. भूमकर पुलाजवळ अपघातस्थली अधिकाऱ्यांनी बुधवारी पाहणी केली. तसंच महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त यांनीही पाहणी केली. नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत चारशे मीटर अंतरावर रम्बलर्स केले जाणार आहेत.