पुणे : पुण्यात गुन्हेगारीचा आलेख हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मारहाण, हत्या, अपहरण अशा अनेक घटना रोज पुढे येत असून सोमवारी रात्री ९ च्या सुमारास मनाला सुन्न करणारी एक घटना पुढे आली आहे. एका महिलेने आपल्या पोटच्या चार वर्षाच्या मुलीला चाकूने भोसकून ठार मारले आहे. तिने ही पाऊल का उचलले या बाबत माहिती मिळू शकली नाही. ही घटना हडपसर परिसरात सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.
वैष्णवी महेश वाडेर ( वय ४ ) असं खून झालेल्या मुलीचं नाव आहे. या प्रकरणी तिची आई कल्पना हिला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. हडपसर येथील सिद्धिविनायक दुर्वांकुर सोसायटी ससाणे नगर येथे ही घटना घडली आहे. आरोपी कल्पना ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात हे दोघे या हडपसर येथील वरील सोसायटीमध्ये राहायला आले होते. आरोपी महिला ही बेकरी प्रॉडक्ट विक्री करून आपली गुजराण करत होती. कल्पना सोमवारी भाड्याचे घर खाली करणार होती. त्यामुळे घरमालक तिथे गेले होते. दरम्यान, आरोपी कल्पनाने घरचा दरवाजा आतून बंद केला होता. शेजारच्यांनी तिला दरवाजा उघडण्यास सांगितले. दरम्यान, तिने दरवाजा उघडल्यावर सर्व जन हादरले. जमिनीवर चिमुकल्या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेला दिसला. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला अटक केली आहे. या हत्येमागील कारणाचा शोध घेतला जात आहे.