मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  घराचा व बाथरूमचा दरवाजा आतून बंद; प्रेयसीच्या आईचा गळा आवळून खून, हत्येची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले

घराचा व बाथरूमचा दरवाजा आतून बंद; प्रेयसीच्या आईचा गळा आवळून खून, हत्येची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 22, 2024 12:18 AM IST

Pune Crime : प्रेमसंबंधास विरोध करणाऱ्या प्रेयसीच्या आईची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर मृतदेह बाथरुममध्ये टाकला व बाथरुमचा तसेच घराचा दरवाजा आतून बंद केला. यामुळे या प्रकरणाचा तपास करणं पोलिसांसमोर एक आव्हान होतं.

file Pic
file Pic

मुलीसोबत प्रेमसंबंधांना विरोध केल्याने तरुणाने बेल्टने गळा आवळून प्रेयसीच्या आईचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. घराचा दरवाजा आतून बंद होता, बाथरुमचा दरवाजाही आतून बंद होता. महिलेचा मृतदेह बाथरुममध्ये पडला होता. शवविच्छेदन अहवालात महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले व हत्येची ही पद्धत पाहून पोलीसही चक्रावले. 

वर्षा क्षीरसागर (वय ५८, रा पाषाण) असे मृत महिलेचे नाव आहे. तर शिवांशु दचाराम गुप्ता (वय २३, येरवडा) असे आरोपीचे नाव असून त्याला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली  हा प्रकार १८ जानेवारी रोजी मध्यरात्री बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडला.

आतून बंद असलेल्या बाथरुममध्ये दुसरे कोणी जाऊन कसे काय हत्या करू शकतो, हे कोडे पोलिसांना पडले होते. मात्र मोठ्या शिताफीने पोलिसांनी या प्रकरणाचे रहस्य बाहेर काढले आहे. आरोपी व मृत महिलेच्या मुलीमध्ये गेल्या सात महिन्यापासून प्रेमसंबंध होते. मात्र मुलीच्या आईला हे संबंध मान्य नव्हते. १८ जानेवारी रोजी मुलगी बाहेरगावी गेल्यानंतर वर्षा या एकट्याच घरी होत्या. तेव्हा शिवांशु घरी आला. त्याने त्यांच्याशी वाद घातला व त्यांचा गळा आवळून खून केला तसेच मृतदेह बाथरुममध्ये टाकून तो निघून गेला.

मुलगी दुसऱ्या दिवशी परत आल्यानंतर तिला घराचे दार आतून बंद असल्याचे दिसले. तिने अनेक हाका मारूनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांची आई ही बाथरुममध्ये असल्याचे व दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. बाथरुमचा दरवाजाही तोडल्यावर वर्षा या मृतावस्थेत आढळल्या. शवविच्छेदनात रिपोर्टमध्ये त्यांचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले आहे. महिला एकटी घरी असताना शिवांशु गुप्ता रात्री घरी येऊन गेल्याचे समजले. त्याच्याकडे तपास केल्यावर त्याने खूनाची कबुली दिली तसेच खून केल्यानंतर बाथरून व घराचे दार आतून कसे बंद केले हे सांगितले.

WhatsApp channel