Pune Water And Orillia Pub : पुण्यात कल्याणी नगर येथे शनिवारी एका बड्या बिल्डर पुत्राने मद्यधुंद अवस्थेत पोर्शेकारने धडक देऊन दोघा मुलांच्या मृत्यूला जबाबदार ठरला होता. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून आता पर्यंत या प्रकरणी आरोपी मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. तर मुलाला दारू दिल्या प्रकरणी काल कॉझी आणि ब्लॅक पबवर कारवाई करण्यात आली होती. या पबच्या मॅनेजर आणि मालकाला अटक करण्यात आली होती. दरम्यान ही कारवाई ताजी असतांना आता आज पुणे महानगर पालिकेने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील वॉटर आणि ओरीला या प्रसिद्ध पबवर हातोडा चालवत कारवाई केली आहे.
पुण्यात कल्याणी नगर येथे अपघाताचे प्रकरण हे चांगलेच तापले आहे. पुणे पोलिसांनी कॉझी अँड ब्लॅकवर कारवाई करत हॉटेलच्या मॅनेजरला आणि मालकावर गुन्हा दाखल अटक केली होती. दरम्यान, आज पुणे महानगर पालिकेने पुण्यातील बारवर कारवाईच्या बडगा उगारला आहे. नियम न पाळल्याने पालिकेने शहरात नियमबाह्य पद्धतीने बार आणि पबवर चालवण्यात येत असलेल्या सर्व पब आणि बारला नोटिसा पाठवल्या आहेत. तसेच आज सकाळी कोरेगाव पार्क येथील वॉटर्स आणि ओरिला या दोन बड्या पबवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. हे दोन्ही पब पुण्यातील नामांकित आहेत. या पबमध्ये शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात तरुणाई थीरकत असते. रात्री उशिरा पर्यंत हे पब सुरू असतात. हे पब अनधिकृत पणे सुरू असल्याची माहिती होती. मात्र, कारवाई होत नव्हती. मात्र, कल्याणी नगर अपघातानंतर आता पुणे महानगर पालिकेला जाग आली आहे. या पबवर थेट कारवाई करण्यात येथील अतिक्रमण पाडण्यात आले आहेत.
शनिवारी कल्याणी नगर येथे पोर्शे कार अपघातील अल्पवयीन आरोपीला व त्याच्या मित्रांना दारू दिल्या प्रकारी हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) व पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल व परमिट रूम आणि पबवर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत याला टाळे ठोकले होते. त्यानंतर आज पुणे महानगर पालिकेने ही मोठी कारवाई केली आहे.
पुण्यातील पब संस्कृतीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील तपासणी मोहीम हाती घेतली आहे. पुण्यातील सर्व पब्ससह व परमिट रूमची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पबमध्ये अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करून नये आणि १.३० नंतर मद्याची विक्री करू नये या सारख्या अनेक सूचना देण्यात आल्या आहेत.
बॉम्बे प्रोहिबिशन कायदा १९४९ आणि बॉम्बे फॉरेन लिकर नियम १९५३ अंतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. संबंधित हॉटेल, पब आणि आस्थापनेला मद्य विक्रीबाबत देण्यात आलेले परवाने निलंबित अथवा रद्द करण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे.