Girish Bapat Profile : भाजपचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गिरीश बापट यांच्या निधनामुळं एक सर्वसमावेशक नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. याचं कारण बापट यांच्या स्वभावात आणि संस्कारात होतं. त्यांच्या याच मोकळेपणामुळं व आपलेपणामुळं ते कधीच विशिष्ट वर्गाचे नेते राहिले नव्हते. ते खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी ठरले होते.
गिरीश बापट यांचा मूळचा पुण्याचा, तळेगाव दाभाडे इथला. पुण्यातच त्यांचं बालपण गेलं. बापट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झाले होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी १९ महिने तुरुंगवास भोगला होता. पदवीधर असलेले बापट हे टेल्को कंपनीत कामगार नेते होते. १९८० साली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले. पुणे भाजपचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पुढं १९८३ मध्ये ते पुणे महापालिकेचे नगरसेवक झाले. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष, आमदार व खासदार पदापर्यंत पोहोचले. राज्य सरकारमध्ये मंत्रिपद भूषवण्याची संधीही त्यांना मिळाली होती. पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांनी भूषवलं होतं.
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातून ते अनेक वर्षे राज्य विधानसभेत निवडून येत होते. बापट हे भाजपचे नेते असले तरी सर्वच पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते. लोकांच्या पातळीवरही हेच होतं. जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून त्यांनी समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं.
सर्वसमावेशकता हा बापट यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर त्यांचा विश्वास होता. मोकळ्या-ढाकळ्या स्वभावामुळं विरोधी पक्षाच्या नेत्यांशीही ते सहज जुळवून घेत. कसब्यातील ब्राह्मण मतदार जितका हक्कानं बापट यांच्याकडं यायचा, तितक्याच प्रेमानं झोपडपट्टीतील गरीब आणि मुस्लिम मतदारांना बापट आपले वाटायचे. त्यांच्या राजकीय यशाचं हेच गमक होतं.
चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत त्यांना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं. काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. आजाराशी ते निर्धारनं लढत होतं. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रीय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. नुकत्याच कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपनं त्यांना एका कार्यक्रमात आणलं होतं. त्यावेळी त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्या अवस्थेत बापट यांना पाहून मतदारही हळहळले होते. आज त्यांच्या निधनामुळं एक हक्काचा माणूस गमावल्याची भावना पुणेकर व्यक्त करत आहेत.