पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे,पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ३ हजार ३६२ सदनिकांसाठी बुधवारी (२९ जानेवारी) सोडत काढली जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने सोडत काढली जाणार आहे.
दुपारी १ वाजता पुणे जिल्हा परिषद सभागृहात ही सोडत पार पडणार आहे. अर्जदारांना निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. तसेच लॉटरीचा निकाल मोबाईलवर एसएमएसद्वारेही मिळणार आहे.
पुणे विभागीय लॉटरीसाठी १० ऑक्टोबर २०२४ पासून ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली होती.यायोजनेच्याअंतर्गत ९३ घरे, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण ३५६९ घरांचा समावेश आहे.
म्हाडाच्या जाहिरातीमध्ये एकूण ६ हजार ४२० सदनिकांचा समावेश केला होता. त्यापैकी २ हजार ७५८ सदनिकांचा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, पंढरपूर येथील म्हाडा योजनेची २८, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील म्हाडाची ६५ व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ३ हजार ५६९ सदनिकांचा सोडतीसाठी समावेश केला होता. अर्जदारांच्या विनंतीनुसार तसेच दिवाळी व विधानसभा निवडणुकांमुळे अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेमधील २ हजार ७५८ सदनिकांसाठी सुमारे १ हजार ३७५ अर्ज प्राप्तझाले आहेत.सोडतीसाठीच्या उर्वरित ३ हजार ६६२ सदनिकांसाठी एकूण ९३ हजार ६६२ अर्ज प्राप्त झाले. त्यातील ७१ हजार ६४२ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली असून केवळ अनामत रक्कम भरलेल्या अर्जदारांचे अर्ज सोडतीसाठी समाविष्ट करण्यात आले आहेत. सोडतीचा कार्यक्रम मंत्रालयातून बुधवारी (२९ जानेवारी) ऑनलाइन होणार आहे.
अर्जदारांसाठी जिल्हा परिषदेतील शरदचंद्र पवार सभागृहात कार्यक्रम होणार आहे. तसेच ऑनलाईन लिंकही क्रिएट केली जाणार आहे. अर्जदारांना'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
संबंधित बातम्या