Ganesh Chaturthi 2023 Pune Metro : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये आजपासून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळं गणेशभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईसह पुणे, नाशिक आणि नागपुरात भाविकांनी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील मुख्य शहरांमध्ये भाविक रात्रीच्या वेळी शहरातील प्रमुख गणपतींच्या मूर्ती आणि सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी करत असतात. त्यामुळं आता पुणे मेट्रोने गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात २२ सप्टेंबर पासून रात्री १२ वाजेपर्यंत मेट्रो सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या २२ ते २७ सप्टेंबर पर्यंत पुण्यातील मेट्रो सेवा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळं गणेशभक्तांना शिवाजीनगर, कोथरूड, पेठांचा भाग, सिंहगड रोड आणि पिंपरी-चिंचवड शहरातील गणपती पाहण्यासाठी प्रवासाची मोठी सोय होणार आहे. गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी पुण्यातील भाविक पहाटेपर्यंत गर्दी करत असतात. त्यामुळं रात्रीच्या वेळेला नागरिकांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी महामेट्रोने २२ ते २८ सप्टेंबर दरम्यान मध्यरात्री बारापर्यंत मेट्रो सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं पुणे शहरातील गणेशभक्तांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
येत्या २८ सप्टेंबरला सकाळी सहा वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ सप्टेंबरला पहाटे दोन वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. याशिवाय रात्री दहा वाजेनंतर दर १५ मिनिटांनी मेट्रोची फेरी असणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील विविध भागांमध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून विसर्जन मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. विसर्जनाच्या दिवशी पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल केला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या