pune metro news : पुणे मेट्रोस्थानकात शुक्रवारी दुपारी एक मोठा अपघात टळला. मेट्रोच्या शिवाजीनगर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात दुपारी २. २२ मिनिटांनी अचानक एक चिमुरडा खेळता खेळता मेट्रोच्या ट्रॅकवर पडला. त्याला वाचवण्याच्या नादात त्याची आई देखील ट्रॅकवर पडली. याच वेळी दोन मेट्रो या स्थानकात वेगाने येत होत्या. दरम्यान, स्थानकावर एकच गोंधळ उडाला. ही बाब सुरक्षा रक्षकाला समजताच त्याने प्रसंगावधान दाखवत आपत्कालीन स्थितीत मेट्रो थांबविण्याचे बटण दाबल्याने दोघाही माय लेकाचे प्राण वाचले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
जिल्हा न्यायालयात शुक्रवारी दुपारी हा थरार घडला. एक महिला ही तिच्या तीन वर्षांच्या मुलासोबत मेट्रोने प्रवास करण्यासाठी आली होती. दरम्यान, तिचा मुलगा हा प्लॅटफॉर्मवर खेळत होता. यावेळी हा मुलगा ट्रॅकच्या दिशेने धावत गेला आणि ट्रॅकवर पडला. दरम्यान, ही बाब त्याच्या आईच्या देखील लक्षात आली. ती देखील मुलाला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावली अन् ती देखील ट्रॅकवर पडली. यावेळी स्थानकावर मोठा गोंधळ उडला. स्थानकावरील काही प्रवाशांनी त्या दोघांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्याचवेळी दोन्ही ट्रॅकवरून ३० मीटर अंतरावर दोन गाड्या वेगाने स्थानकात येत होत्या.
ही बाब पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर याच्या लक्षात आली. त्याने प्रसंगावधान राखत ३ वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक विकास बांगर याने फलाटावरील आपत्कालीन मेट्रो थांबविण्याचे प्लंजर बटन वेळीच दाबले.
त्यामुळे स्थानकाच्या दोन्ही दिशांनी वेगाने येणाऱ्या मेट्रो ट्रेन त्वरित थांबल्या. यावेळी स्थानक आणि मेट्रो यामधील अंतर केवळ ३० मीटर इतके होते. मेट्रो ट्रेन थांबल्यानंतर मुलगा व त्याच्या आईला सुखरूप रित्या रुळांवरून बाहेर काढण्यात आले व परिवाराशी त्याची भेट करून देण्यात आली.
विकास बांगर यांच्या समयसूचकतेबद्दल आणि धाडसी कार्याबद्दल महा मेट्रोतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. बांगर यांच्यामुळे इतरांनाही आपत्कालीन स्थितीत प्रसंगावधान राखत मदत करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी सांगितले.