Pune Metro Update : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. या पावसाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला बसला. गुरुवारी पुण्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी पुणे मेट्रोच्या भुयारी प्रकल्पाचे उद्घाटन व एसपी कॉलेजच्या मैदानावर होणारी सभा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे आता मेट्रोचे उद्घाटन कधी होणार असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला होता.
दरम्यान, आता मेट्रोच्या उद्घाटनाची नवी तारीख जाहीर झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. रविवारी (दि २९) मोदी हे व्हिडिओ कॉन्फरंन्सद्वारे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहे. यानंतर भुयारी मार्ग लोकांच्या सेवेसाठी सुरू केला जाणार आहे.
पुण्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गुरूवारी होणारे मेट्रोचे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे लोकार्पण रद्द करण्यात आले होते. त्यामुळे नवी तारीख कधी जाहिर होणार या बाबत चर्चा सुरू होत्या. त्यानुसार नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा न्यायालयापासून ते स्वारगेटपर्यंतच्या मेट्रोचे उद्घाटन रविवारी (दि २९) पंतप्रधान मोदींच्या हस्ते केले जाणार आहे. हा कार्यक्रम ऑनलाइन होणार असून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मोदी पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट असे ३.६२ किमी अंतराचा हा मार्ग पुणेकरांसाठी रविवारी खुला केला जाणार आहे. यामुळे नागरिकांना आता स्वारगेट पर्यंत जाता येणार आहे.
पंतप्रधान मोदी रविवारी मेट्रो स्थानका सोबतच स्वारगेट - कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील करणार आहेत. याचसोबत पंतप्रधान मोदी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले स्मारक भिडे वाडा येथे पहिल्या मुलींच्या शाळेचं भूमिपूजन देखील करणार आहेत. तर बिडकीन औद्योगिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर लोकार्पण आणि सोलापूर विमानतळाचे उद्घाटन देखील मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
मेट्रोचे उद्घाटन रद्द झाल्याने विरोधक आक्रमक झाले होते. विरोधक आज मेट्रोचे प्रतीकात्मक उद्घाटन करणार आहे. तसेच मेट्रोसेवा सुरू करण्याची मागणी करणार आहेत. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मेट्रोचे उद्घाटन लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले की, पंतप्रधान अशा कार्यक्रमांसाठी पुण्याला येतात, हा आमचा सन्मान आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याची मोदींची परंपरा आहे. अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर टीका कशी करायची आणि राजकारण कसं करायचं हे विरोधकांनाच माहित आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने हा मेट्रो मार्ग विनाविलंब नागरिकांसाठी खुला करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, मेट्रो जनतेसाठी आहे. ती तयार असेल तर ती कार्यान्वित व्हायला हवी. गरज पडल्यास शुक्रवारी आम्ही स्वत: त्याचे उद्घाटन करू. दरम्यान या मागणीसाठी शुक्रवारी सिव्हिल कोर्ट स्टेशनवर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या आयोजनासाठी कोट्यवधी रुपये वाया घालवल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली. काँग्रेस आमदार रवींद्र धांगेकर म्हणाले, 'भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतरही भाजप नेत्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी कोट्यवधी रुपये वाया घालवले.
पुण्यात बुधवारी अवघ्या तीन तासांत १३३ मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारचा पाऊस हा गेल्या १०० वर्षांतील सप्टेंबरमधील पुण्यातील २४ तासांतील सर्वाधिक पाऊस असून १९३८ मधील १३२ मिमी पावसाचा विक्रम या दिवशी मोडला गेला. मेट्रो मार्गाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान ज्या एस. पी. कॉलेज मैदानात सभा घेणार होते, तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. स्थानिक प्रशासनाने प्रयत्न करूनही गुरुवारी सकाळपर्यंत या ठिकाणाहून पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. राज्य सरकारने हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा सभागृहात हलवण्याचा विचार केला, पण स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने (एसपीजी) त्यास नकार दिला. अखेर भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने पंतप्रधान कार्यालयाला आपला दौरा रद्द करावा लागला. रद्द झाल्यानंतर पुणे मेट्रोने अन्य मार्गांवर सेवा सुरू केली, परंतु सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट दरम्यानचा भूमिगत मार्ग बंद होता. दरम्यान, भूमिगत कॉरिडॉर सुरू करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी आंदोलनाची योजना आखत असून या मार्गावरील कामकाज सुरू करण्याबाबत प्रशासनाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन भाजपने दिले आहे.