नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी एकूण… मंत्र्यांच्या शपथविधीचा दिमाखदार सोहळा दिल्लीत राष्ट्रपती भवनच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यात एकीकडे भाजप आणि मित्रपक्षांचे अनुभवी, मुरब्बी नेत्यांचा शपथविधी संपन्न झाला तर दुसरीकडे नवखे, पहिल्यांदा निवडून आलेले खासदारांचा समावेश होता. महाराष्ट्रातून सहा खासदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. यात नागपूरचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, मुंबई -उत्तरमधून प्रथमच लोकसभेवर निवडून गेलेले पियूष गोयल यांच्यासोबत बुलडाण्यातून चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले प्रताप जाधव आणि रावेरमधून तिसऱ्यांदा खासदार झालेल्या रक्षा खडसे, ज्येष्ठ आरपीआय नेते रामदास आठवले आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचा समावेश होता. पुण्यातून पहिल्या प्रथम खासदार म्हणून निवडून आलेले मोहोळ यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने पुणेकरांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. पुण्याचे नगरसेवक, महापौर आणि आता थेट केंद्रात मंत्री झालेले मोहोळ यांची राजकीय कारकिर्द झंझावाती अशीच आहे.
मुरलीधर मोहोळ यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९७४ रोजी मुळशीमध्ये एका कष्टकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील किसन मोहोळ हे मुळचे मुठ्याचे राहणारे. नोकरीनिमित्त ते पुण्यात आले. काही काळ पुण्यातील मंडईत हमाली केला. त्यानंतर काही काळ रसवंती चालवल्यानंतर ते बॅंकेत कामाला लागले. मुरलीधर मोहोळ यांचे दुसरीपर्यंतचे शिक्षण मुठ्याच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर तिसरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पुण्याच्या भावे स्कूलमधून घेतले. मुरलीधर मोहोळ लहाणपणी त्यांच्या वडिलांना रसवंतीच्या कामामध्ये मदत करायचे. मोहोळ यांना कुश्तीची आवड बघता ते कोल्हापूरला गेले. तेथे त्यांचे बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. कुश्तीत त्यांनी राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवली होती.
पुण्यात परतल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी १९९३ साली भाजपसोबत आपली राजकीय कारकिर्द सुरू केली. कोथरुडमध्ये श्री साई मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचा प्रारंभ केला होता. पुणे शहर भाजपमध्ये वॉर्ड सरचिटणीस, वॉर्ड अध्यक्ष, भाजप युवा मोर्चाच्या शिवाजनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष, युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव, उपाध्यक्ष, शहर भाजपचे सरचिटणीस, शिक्षण मंडळाचे सदस्य, प्रदेश सरचिटणीस अशा विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. पुणे महानगरपालिकेचा सभासद म्हणून ते २००२, २००७, २०१२ आणि २०१७ असे चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २०१९ ते २०२२ दरम्यान ते पुणे शहराचे महापौर होते. करोना साथीच्या काळात मुरलीधर मोहोळ यांनी महापौर असताना मोठी कामगिरी बजावली होती. पुण्यात कोरोना साथ फैलावत असताना आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी त्यांनी जनतेत जाऊन सेवा केली होती.