Pune Crime: पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जातायेत. मात्र, तरीही अशाप्रकारच्या घटना थांबायचं नाव घेत घेईना. किरकोळ कारणांवरून लोक एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली. पेट्रोल भरण्यासाठी पैसे न दिल्याने मित्रावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
अरबाज अरिफ सय्यद (वय,२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो कोंढवा येथील कुबेरा कॉलनीतील रहिवासी आहे. अरबाजने रविवारी सकाळी पेट्रोल भरण्यासाठी पैसे न दिले म्हणून त्याचा मित्र योगेश रामदार लोंढे (वय, २८) याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यानंतर योगेशने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अरबाजला पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी योगेश हा कोंढव्यातील कडनगर परिसरातील एका पंक्चरच्या दुकानात थांबला होता. त्यावेळी अरबाजने त्याला पेट्रोलसाठी पैसे मागितले. परंतु, योगेशने त्याला पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या अरबाजने योगेशला शिवीगाळ करत मारहाण केली आणि नंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. यानंतर अरबाज घटनास्थळावरून पसार झाला. योगेशने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अरबाजला शोधून त्याला अटक केली. याप्रकरणी कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरात चांदीचा व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हुपरी औद्योगिक वसाहतीतील सिल्व्हर झोन येथे रविवारी सायंकाळी मृत ब्रह्मनाथ सुकुमार हलांडे (वय, ३१) हे घरी एकटेच होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. शनिवारी त्याचे आई-वडील काही वैयक्तिक कामे पूर्ण करण्यासाठी निपाणीजवळील आपल्या गावी गेले होते. त्याचा फायदा घेत आरोपीचा भाऊ प्रवीण सुकुमार हलांडे व त्याचा मित्र आनंद खेमलापुरे या दोन सहाय्यकांनी रविवारी सायंकाळी त्यांच्या घरात घुसून ब्रह्मनाथ यांच्यावर चाकूने वार केले. तसेच आरोपींनी त्यांच्या घरातून १० किलो चांदी, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या.
गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आणि त्याचा भाऊ आरोपी प्रवीण हे चांदीचा व्यवसाय करतात. आपला भाऊ आपल्या ग्राहकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असून त्याचा परिणाम त्याच्या व्यवसायावर होत असल्याचा संशय प्रवीणला होता. त्याशिवाय दोन्ही भावांमध्ये मालमत्तेशी संबंधित वाद होते. त्यामुळे या कारणावरून संतापलेल्या आरोपीने मित्र आनंदच्या मदतीने भावाला ठार मारण्याचा निर्णय घेतला. गायकवाड यांनी सांगितले की, प्रवीणसह आनंदचा मृतावर झालेल्या हल्ल्यात सहभाग होता. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.