Pune khedshivapur crime : पुण्यात नवीनवर्ष जल्लोषात साजरे करण्यात आले. यावेळी गोव्यावरून अवैधरित्या आणलेला मद्यसाठा सोमवारी पहाटे खेड शिवापूर टोलनाक्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून जप्त केला. तब्बल १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. नवीन वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
पुण्यात नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असतांना गोव्यातून मद्य विक्रीसाठी आणले जात होते. या मद्याची विक्री ही पुण्यात केली जाणार होती. या बाबतची माहिती गुप्त बातमीदारांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाला मिळाली. एका मोठ्या ट्रकमधून हा मद्यसाठा येणार होता. दरम्यान, खेड शिवापुर टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला. येथे असलेल्या टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करण्यात येऊ लागली.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाक्याजवळ उत्पादन शुल्कच्या पथकाला एक संशयती ट्रक दिसला. त्यांनी तो ट्रक थांबवला. या ट्रकची तपासणी करण्यात आली तेव्हा या ट्रकमध्ये मद्याचा मोठा साठा आढळून आला. हे मद्य गोव्यात तयार करण्यात आले होते. तब्बल एक हजार खोक्यांमध्ये १ कोटी रुपयांची दारू आणण्यात आली होती. एक हजार मद्याची खोकी, ट्रक व मद्याच्या बाटल्या असा एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ट्रकचालक व त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.