Pune Politics : पुणे म्हटले की पुणेरी पाट्या आठवतात. या पाट्यातून पुणेकर समोरच्याचा चांगलाच पाणउतारा करत असतात. मोजक्या शब्दांत टोमणे मारायला पुणेकर प्रसिद्ध आहेत. अशाच एका पाटीतून पुणेकरांनी पुण्यातील पुढाऱ्यांना आरसा दाखवला आहे. जागृत पुणेकर अशा आशयाच्या पाटीची चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे.
राज्यात गेल्या दोन वर्षात अनेक राजकीय उलथा पालथी झाल्या आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटलेत. ईडी आणि सीबीआयच्या भीतीने अनेक राजकीय पुढारी भाजपात गेले. तर भ्रष्टाचार विरोधी असणाऱ्या भाजपमध्ये जाऊन अनेक नेते शुद्ध झाले आहे. या नेत्यांना उद्देशून पुण्यात राजकीय बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर सोशल मीडियामध्ये चांगलेच व्हायरल झाले आहेत. याची चर्चा पुण्यात सुरू आहे.
पुण्यात राजकीय रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असतांना ‘जागृत पुणेकर’, या नावाने लावण्यात आलेल्या बॅनर्सची चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे. या बॅनरमध्ये पाच वर्ष पक्ष सोडणार नाही असं आश्वासन देणाऱ्या उमेदवारालाच आपलं मत द्या, असे आवाहन पुणेकरांनी केले आहे. जुन्या पुणे शहरातील अनेक ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हे बॅनर्स कोणी लावले, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, या पाटीतून पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना पुणेकरांनी चांगलाच टोमणा मारला आहे.
”मी आमच्या पक्षाशी व पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि मतदारांशी ५ वर्ष प्रामाणिक राहीन, कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. गेलो तर पुन्हा मला किंवा आमच्या घरातील व्यक्तीला निवडून देऊ नका,” जो उमेदवार आपल्या परिचय पत्रात असे लिहिन त्यांनाच मतदान करा, असा मजकूर या बनर्सवर लिहिण्यात आला आहे.
सध्या पुण्यात प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. भाजप आणि महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर निवडणूक रणांगणात उतरले आहेत. त्यात वसंत मोर हे देखील पुण्यातून इच्छुक असून निवडणूक लढण्याची त्यांनी तयारी केली आहे. सध्या अपक्ष लढण्याच्या तयारीत ते आहेत. प्रचारात पुण्याचा विकास हा मुद्दा त्यांनी प्रामुख्याने धरून लावला आहे. त्यावर उमेदवार मतदारांना मते मागत आहे. मात्र, जागृत पुणेकर या पाटीतून ना विकास ना प्रगती फक्त पक्ष न बदलणारा नेता हवा आहे असे पुणेकरांना सांगितलं जातआहे.