Pune Pub Bar Hotel : पुण्यात कल्याणी नगर येथील पोर्शे कार अपघातानंतर पुण्यातील नाइट लाईफ चर्चेत आली होती. पुण्यातील पब हॉटेल बार वर पोलिस मेहरबान असल्याची चर्चा होती. पुण्यातील बेकायदेशीर हॉटेल पब बारला अभय कुणाचे हा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता. या विरोधात रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन देखील केले होते. त्यामुळे प्रशासनाला जाग अली असून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार आतापर्यंत ६३ हॉटेल, रूफटॉप, रेस्टो बार आणि पबचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे.
कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले होते. या आपघतामुळे पुण्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर हॉटेल आणि पबचा प्रश्न ऐरणीवर आला होता. नगिरकांच्या रोषानंतर प्रशासनाकडून आता धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. दारूची दुकाने, बार, पबमध्ये नियमांचे पालन करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले असतांनाही या नियमांचा भंग होत असल्याचा आरोप करण्यात येत होता. यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या रूफटॉप, रेस्टो बार आणि पबवर कारवाई करण्यात आली आहे. या बाबतचे आदेश हे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिले होते.
या बाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, १९ पबवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. उत्पादन शुल्क विभागाला तसे आदेश आले होते. यावर्षी ६३ पब मध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तर ८२ रूफटॉप, रेस्टो बार आणि पबवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
पुणे पोर्शे अपघातानंतर पुणे पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच राज्य व उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला असून यानंतर धडक कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. पुण्यात रात्रीची गस्त वाढवण्यात आली असून ड्रंक अँड ड्राइवची कारवाई देखील तीव्र करण्यात आली आहे.
कल्याणीनगर येथे बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोघांना चिरडल्यावर मोठा प्रक्षोभ झाला होता. या नियमांची काटेकोर अमलबजावणी सुरू झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आणि महानगर पालिकेने देखील अनेक हॉटेल पबवर बुलडोजर चालवला आहे. गेल्या वर्षी पब बारचे ८१ परवाने कायमचे रद्द करण्यात आले होते. तर एप्रिल २०२४ पर्यंत ७० पेक्षा जास्त परवानाधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ६३ परवाने तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत.