Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Updated May 18, 2024 07:38 PM IST

Pune Hoarding Collapsed : पुणे-सोलापूर मार्गावरील कवडीपाट टोल नाका जवळ गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरच रस्त्याकडेला असलेले होर्डिंग कोसळले. याखाली दुचाकी, चारचाकी वाहनांसह बँड पथकाच्या गाडीचे मोठे नुकसान झाले.

पुणे-सोलापूर मार्गावरील होर्डिंग कोसळलं
पुणे-सोलापूर मार्गावरील होर्डिंग कोसळलं

राज्यात होर्डिंग अपघाताच्या घटना वाढताना दिसत आहेत. मुंबईतील घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर १२० फुटी महाकाय होर्डिग कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवडनंतर आता पुण्यात आणखी एक होर्डिग कोसळल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये होर्डिंग कोसळून अनेक वाहनांचे नुकसान झालं होतं. मुंबई व पिंपरी चिंचवडमधील या घटना ताज्या असताना पुण्यात आता आणखी एक होर्डिंग कोसळ्याची घटना घडली आहे.

पुणे परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पुणे-सोलापूर मार्गावरील कवडीपाट टोल नाका जवळ गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरच रस्त्याकडेला असलेले होर्डिंग कोसळले. याखाली दुचाकी, चारचाकी वाहनांसह बँड पथकाच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. यावेळी नवरदेवाला मिरवणुकीसाठी आणलेला घोडा सुद्धा होर्डिंग अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेत बँड पथकाचं मोठं नुकसान झालं असून त्यांचा नवरदेवासाठी आणलेला घोडाही गंभीर जखमी झाला आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर या ठिकाणी ही घटना घडली आहे. या घटना वारंवार घडत असूनही प्रशासनाकडून काहीच उपाय योजना होत नसल्याचे समोर आले आहे.

 होर्डिंग गुलमोहर लॉन्समध्ये लग्न समारोह पार पडला होता. यावेळी बँड पथक कार्यालयाबाहेर उभे होते. त्यावेळी होर्डिंग कोसळले व त्याखाली बँड पथकासह मिरवणुकीसाठी आणलेला घोडाही अडकला होता. होर्डिंग अंगावर पडल्यामुळे घोडा गंभीर जखमी झाला आहे. त्याला बाहेर काढण्यात आले. गुलमोहर लॉन्स कार्यालयासमोर अनेक दुचाकी, कार पार्किंग केल्या होत्या. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये मोशीत होर्डिंग कोसळलं -

तीन दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं होतं. यात चार गाड्या होर्डिंगखाली दबल्या होत्या. यात गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात सायंकाळच्या सुमारास हे होर्डिंग कोसळलं. हे होर्डिंग रस्त्यावर न पडता विरुद्ध बाजूला पडल्याने होर्डिंगच्या बाजूला उभ्या असलेल्या चार गाड्या अडकल्या. ही वाहने तिथे पार्क केलेली होती. दरम्यान, घाटकोपरमधील घटनेनंतर मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत होर्डिंग काढण्याचे काम सुरु झालेले आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर