Pune New Year Celebration : नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडेच लगबग सुरु आहे. पुणेकर देखील नवीन वर्षाचं जंगी स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.पुण्यात आज अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले असून या पार्ट्यांमध्ये तरुणाई झिंगणार आहे. या पार्टीत जर दारू जास्त झाली तर घरी कसे जायचे हा प्रश्न होता. मात्र, आता कितीही दारू पिऊन झिंगले तरी तुम्हाला घरी सोडण्याची व्यवस्था स्वत: हॉटेल व्यवस्थापन करणार आहे. होय, या बाबतचा निर्णय पुण्यातील हॉटेल्स असोसिएशनने घेतला आहे.
आह पुण्यातील सर्वच ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, पब चालकाकडून मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, दारू पिऊन गाडी चालवून अपघात झाल्याच्या अनेक घटना पुण्यात घडल्या आहे. त्यामुळे पुणे शहरातील हॉटेल्स असोसिएशनने एक नियमावली जाहीर केली असून त्यानुसार झिंगलेल्या तळीरामांना हॉटेल्स मार्फत घरी सोडले जाणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली.
हॉटेल असोसिएशनने नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर नियमावली जाहीर केली आहे. आज पुण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. तर हॉटेल देखील पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दरम्यान, खबरदारी म्हणून हॉटेल असोसिएशनने ही नियमावली बनवली असून त्यानुसार एखाद्या व्यक्तीनं जास्त दारू प्यायलयास त्याला दारू सर्व्ह करणं बंद केले जाणार आहे. त्यांच्या ग्रूपमधील लोकांना याची माहिती दिली जाणार आहे. या सोबतच आमच्या स्टाफला देखील आम्ही या बाबत सूचना दिल्या आहेत. कुणी वाद घातल्यास त्यांना शांतपणे प्रतिसाद द्यावा. आमच्या ग्रूपमधील कार चालकांना आम्ही रात्री एक ते दीड नंतर तयार राहण्यास सांगितले आहे. ज्यांना जास्त दारू चढली आहे, त्यांना आम्ही कारने घरी सोडणार आहोत. त्याच्या कडे जरी वाहन असले तरी आम्ही त्यांना आमच्या गाडीतून घरी सोडणार असल्याचे गणेश शेट्टी यांनी सांगितले. काही हॉटेलमध्ये दुसऱ्या दिवशीपर्यंत थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नशेत असलेल्या ग्राहकांची जबाबदारी हॉटेलकडून घेण्यात येणार असल्याचे देखील शेट्टी यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या