मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ambegaon Bus Accident : अन् वेदना विसरून विद्यार्थीनींच्या चेहऱ्यावर क्षणभर फुललं हसू
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जखमी विद्यार्थिनीची चौकशी करताना.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जखमी विद्यार्थिनीची चौकशी करताना.

Ambegaon Bus Accident : अन् वेदना विसरून विद्यार्थीनींच्या चेहऱ्यावर क्षणभर फुललं हसू

29 September 2022, 17:57 ISTNinad Vijayrao Deshmukh

Chandrakant Patil : शालेय विद्यार्थ्यांना भेटणार असल्याने पालकमंत्र्यांनी सोबत ‘खाऊ’ देखील नेला होता. त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रेमळपणे संवाद साधताना त्यांना धीर दिला आणि सोबत चॉकलेटही दिले. ती आवडीची भेट पाहून क्षणभर त्या विद्यार्थीनीही आपल्या वेदना विसरल्या.

पुणे : साईनाथ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थीनींच्या डोक्यावर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा हात मायेने फिरला...घाबरू नको, लवकर बरी हो म्हणत त्यांनी हातातले चॉकलेट विद्यार्थीनीच्या हातात दिले....आणि काही क्षण आपल्या वेदना विसरून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं...शाळेने दिलेले संस्कार न विसरता मुलींनी याही स्थितीत ‘थँक यू’ म्हटलं... जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हे हास्य आणि त्यांचे दोन शब्द सुखावून गेले.

ट्रेंडिंग न्यूज

आंबेगाव तालुक्यात गिरवली येथील बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची पाटील यांनी आज सकाळी साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. जखमी विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार करण्याच्या व आवश्यक सर्व आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना यावेळी श्री. पाटील यांनी डॉक्टरांना‌ केल्या.

आयुकाची दुर्बिण पाहण्यासाठी गेलेल्या पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेच्या बसचा मंगळवारी अपघात झाला. दुर्घटनेत किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना उपचारांती पालकांकडे सोपविण्यात आले होते. पाच विद्यार्थी आणि चालकावर भोसरी येथील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालकमंत्री पाटील यांनी जखमी विद्यार्थीनी आणि चालकाची भेट घेऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. जखमींवर चांगले उपचार करण्याबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार द्यावेत असे त्यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांना भेटणार असल्याने पालकमंत्र्यांनी सोबत ‘खाऊ’ देखील नेला होता. त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रेमळपणे संवाद साधताना त्यांना धीर दिला आणि सोबत चॉकलेटही दिले. ती आवडीची भेट पाहून क्षणभर त्या विद्यार्थीनीही आपल्या वेदना विसरल्या. पालकमंत्र्यांनी मुलींच्या पालकांशीही चर्चा करून मुले लवकर बरे होतील, त्यांच्यावर चांगले उपचार होतील, चिंता करू नका अशा शब्दात धीर दिला. त्यांची ही भेट जखमी विद्यार्थींनींसाठी सुखद आणि धीर देणारी ठरली. यावेळी साईनाथ रुग्णालयाचे संचालक डॉ.सुहास कांबळे, गणेश भेगडे, अमोल थोरात, नामदेव ढाके, सदाशिव खाडे, ताराचंद कराळे आदी उपस्थित होते.

 

विभाग