Pune GBS Update : पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस)चा कहर सुरूच आहे. रोज रुग्णसंख्या वाढत असून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. पुण्यात सोमवारी या आजाराने बाधित असलेल्या एका ३७ वर्षीय वाहनचालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोग्य अधिकाऱ्यांनी या बाबत माहिती दिली. त्यामुळे पुण्यातील जीबीएसशी संबंधित मृत्यूंची संख्या सात झाली असून, यात संशयित आणि खात्रीशीर अशा दोन्ही रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, पुण्यात संसर्गाचे आणखी आठ रुग्ण आढळल्याने संशयित जीबीएस रुग्णांची संख्या १९२ वर पोहोचली आहे. बाधितांची संख्या १६७ झाली आहे, तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी जीबीएसमुळे मृत्यू झालेली व्यक्ती ही पुण्यात ड्रायव्हर म्हणून काम करत होती. सुरवातीला पायात कमजोरी जाणवत असल्याने या व्यक्तीला पुण्यातील शहरातील रुग्णालयात आणण्यात आले होते. या व्यक्तीच्या नातेवाइकांनी त्याला पुण्याच्या दवाखान्यात दाखल न करता त्याला १ फेब्रुवारी रोजी कर्नाटकातील निपाणी येथे नेले.
त्यानंतर या व्यक्तीच्या नातेवाइकांनी आजारी व्यक्तीला सांगली येथील एका रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्या व्यक्तीला जीबीएस उपचारावरील आयव्हीआयजी इंजेक्शन देण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारी रोजी रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याला सांगली हॉस्पिटलमधून पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या व्यक्तीला पुणे महानगरपालिका संचालित कमला नेहरू रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचार सुरू असतांना या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि ९ फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला.
पुण्यात जीबीएसची वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांची चिंता वाढली आहे. पुणे महानगर पालिकेतर्फे उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहे. रुग्ण आढळत असलेल्या परिसराचे सर्वेक्षण आणि पाण्याचे नमुने एकत्र करून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील काही नमुने हे दूषित आढळले आहेत. पुण्यात खासगी आरओ प्रकल्पावरून पाणी भरून नेण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. यातील काही आरोच्या तपासण्या करण्यात आल्या असून या पाण्यात देखील काही जिवाणू आढळले आहेत. त्यामुळे शरातील १९ आरोप्रकल्प हे सील करण्यात आले आहेत. पुणे महानगर पालिकेने नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. तसेच बाहेरील खाद्य पदार्थ खाण्याचे टाळावे असे देखील आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
संबंधित बातम्या