Pune Ganesh Visarjan : गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या आनंदपर्वाची आज सांगता झाली आहे. मोठ्या भक्तीभावाने व भावनिक वातावरण तसेच पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात आज महाराष्ट्राची आराध्य देवता गणरायाला निरोप देण्यात आला. लाडक्या बाप्पाचे १० दिवसांच्या पाहुणचारानंतर आज (बुधवार) विसर्जन होत आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकाचा उत्साह असून पुण्यात मोठया थाटामाटात, ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
पुण्यात सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरुच असून मानाच्या पाच गणपतींचे तसेच दगडूशेट गणपतीचे विसर्जन पार पडले आहे. कसब्याचा गणपती ((Kasba Ganpati) हा पुण्यातील पहिला मानाचा गणपती. तर तांबडी जोगेश्वरी (Tambdi Jogeshwari), गुरुजी तालीम गणपती (Guruji Talim Ganpati),तुळशीबाग गणपती (Tulshibaug Ganpati), केसरीवाडा गणपती (Kesariwada Ganpati ) हे अनुक्रमे दुसऱ्या,तिसऱ्या,चौथ्या व पाचव्या मानाच्या गणपतींचे गतवर्षी प्रमाणे यंदाही सायंकाळी आठच्या आत विसर्जन करण्यात आले आहे. मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला यंदा ८तास लागले आहेत.
या मानाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अलका टॉकीज चौकात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. डेक्कन येथील नदी पात्रालगत पर्यावरण पूरक पद्धतीने या वर्षी गणपतीचं विसर्जन संपन्न झालं.
पुण्यातील पहिला मानाचा असणाऱ्या कसबा गणपती मंडळाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने बुधवारी सकाळी साडेदहावाजताचांदीच्या पालखीतूनमार्गस्थ झाली. साडे चार वाजता नटेश्वर घाटावर कसबा गणपती बाप्पाची आरती करण्यात आल्यानंतर सायंकाळी ४.३४वाजता कसबा गणपतीचं कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.
मानाचा दुसरा गणपती म्हणजे श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे थाटात विसर्जन करण्यात आले. तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणरायाची मिरवणूक यंदाही पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीतूनकाढण्यात आली होती.तांबडी जोगेश्वरी गणपतीचे सांयकाळी ५ वाजून १२ मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.
पुण्यातील मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीची विसर्जन मिरवणूक‘सूर्य’ रथातूनकाढण्यात आली.‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जय घोषात सायंकाळी ६वाजून ४४ मिनिटांनी गुरुजी तालीम गणेशाचे विसर्जन करण्यात आले.
पुण्याच्या मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग गणपतीची मिरवणूक यंदा जगन्नाथ पुरी रथातून काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या या ३२ फुटी उंच रथात मूर्ती ठेवली होती. या बाप्पाचे सायंकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी विसर्जन झाले. तर याची मिरवणूक सकाळी साडे दहा वाजता निघाली होती.
पुण्यातील मानाच्या अखेरच्या व पाचव्या गणपतीचे म्हणजेच श्री केसरीवाडा गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. केसरीवाडा गणपतीचे संध्याकाळी ७वाजून ३३मिनिटांनी विसर्जन झाले. या विसर्जनानंतर पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन संपन्न झाले.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक सायंकाळी दुपारच्या सुमारास निघाली होती. पुणेकर तसेच राज्यातील अनेक गणेश भक्तांचे अतुट श्रद्धास्थान असलेल्या दगडुशेठ गणपतीचं विसर्जन रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी करण्यात आलं. डेक्कन येथील पांचाळेश्वर विसर्जन घाटावर दगडूशेठ गणपतीचं पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आलं.