Pune Ganesh Visarjan : पुण्यात आज गणेशोत्सवाची सांगता दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. विसर्जन सोहळ्यासाठी ६ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गावरून मिरवणूका निघणार असून मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर व उपनगरात मिळून साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून विसर्जन मिरवणुकीची सांगत होईपर्यंत शहर व उपनगरात पोलिसांचा बंदोबस्त कायम राहणार आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ), गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास तैनात करण्यात आले आहेत.
पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत घातक लेसर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच उच्च क्षमतेचे डिजे वापरल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
विसर्जन मार्गावरील दागिने, मोबाइल संच हिसकावणे, तसेच छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस गस्त घालणार आहेत. नागरिकांसाठी मदत केंद्र राहणार आहे. चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे करण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.
शहराच्या मध्यभागातील प्रमुख १७ रस्ते, तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्वरित मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुणे शहरातील सार्वजनिक गणपतीचे विसर्जन सुरू होणार आहे त्यामुळे खालील प्रमाणे बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लावण्यात आलेले पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी बंदोबस्त ४ अप्पर पोलीस आयुक्त, १० पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त २५, पोलीस निरीक्षक १३६, स. पो. नि व पोलीस उप निरीक्षक ६५३, पोलीस अंमलदार ५७०९, एस आर पी एफ ग्रुप १ कंपनी, होमगार्ड एकूण ३९४ असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. गणेश विसर्जन मुख्य मिरवणूक मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरा व अतिरिक्त विशेष कामासाठी एकूण २०६ कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आरसीपी एकूण ६, लिमा ०१, वज्र ०१, व क्यू आर टी च्या १२ टीम तैनात करण्यात आलेले आहेत.
संबंधित बातम्या