पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला उद्यापासून (शनिवार) सुरुवात होत असून उद्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सव काळात शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत काहीसा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये शहरातील एकूण १६ मध्यवर्ती रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शहरातील १२ रस्त्यांवर जड वाहनांना गणेशोत्सवकाळात पूर्णपणे बंदी असणार आहे. शहरातील रस्ते संध्याकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच पीएमपीच्या ६६ मार्गातही बदल करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवाच्या दरम्यान रस्ते बंद असल्याने पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आले असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी गणेशोत्सवादरम्यान पुणे मेट्रोच्या जादा फेऱ्या करण्याचा निर्णय मेट्रोने घेतला आहे.
वाहतुकीसाठी खुले शहरातील रस्ते -
-फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक
-अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक
-मंगला चित्रपटगृहसमोरील प्रीमिअर गॅरेज गल्ली ते कुंभार वेस