पुणे: गणेशोत्सव अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला आहे. पुण्यातील उत्सव अवघ्या जगभरात प्रसिद्ध आहे. यामुळे शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यात पुण्यात दोन दहशतवादी सापडल्याने पुणे पोलिस अलर्ट मोडवर आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात गैर प्रकार टाळण्यासाठी तसेच शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुण्यात तब्बल ७ हजार पोलिसांच्या बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या सोबतच शहरात सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांची देखील नजर राहणार आहे.
जगप्रसिद्धी पुण्यातील गणेशोत्सवाला उद्या मंगळवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात आणि उपनगरात पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.
पुण्यात उत्सवाच्या कालावधीत पुणे शहरात राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या परिसरातून नागरिक दर्शनासाठी येतात. यात परदेशी नागरिकांची संख्या देखील मोठी असते. यामुले उत्सवाच्या कालावधीत मध्यभगाात होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी यंदाच्या बंदोबस्ताचे नियाेजन केले आहे. भाविकांकडील मोबाइल चोरी, दागिने चोरी, तसेच अनुचित प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस बंदोबस्त तैनात केले जाणार आहेत.
पुणे पोलीस आयुक्तालयातील पाच हजार पोलीस कर्मचारी, अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, बाहेरगावाहून मागविण्यात आलेले १ हजार ३०० पोलीस कर्मचारी, एक हजार गृहरक्षक दलाचे जवान, केंद्रीय सुरक्षा दलाच्या पाच तुकड्या बंदोबस्तात राहणार आहे. बंदोबस्तास पोलीस मित्र सहाय्य करणार आहेत.
उत्सवाच्या कालावधीत मानाच्या मंडळांसह गर्दीच्या ठिकाणची बाॅम्ब शाेधक नाशक पथकाकडून तपासणी केली जाणार आहे. पथकातील प्रशिक्षित श्वान, पोलीस कर्मचारी गर्दीच्या ठिकाणाची दिवसभरातून चार वेळा तपासणी करणार आहेत.
पुण्यात गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी १८०० सीसीटीव्ही कॅमेरे ठेवले जाणार आहेत. तर या सोबतच पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सांगितले आहे.
पुण्यात दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही दहशतवादी पुण्यात घातपात करणार होते हे तपासात उघड झाले आहे. त्यांच्याकडे बॉम्ब बनवण्याचे साहित्य देखील सापडले होते. यामुळे संभाव्य दहशतवादी हल्ला, घातपाती कारवाया विचारात घेऊन पोलिसांकडून उत्सवाच्या काळात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या