Pune Ganeshostav 2024 : पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्रकार परिषद घेत गणेशोत्सवानिमित्त पोलीस तयारीची माहिती दिली. गणेशोत्सव काळात ७, १७ आणि १८ सप्टेंबरला पुण्यात दारू विक्रीला बंदी असणार आहे. तसेच खडकी, फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाण्यातील दारूची दुकाने गणेशोत्सव काळात १० बंद ठेवण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितलं.
उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत असून हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महिनाभरापासून पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली होती. पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. पोलिस आयुक्तालयात पत्रकार परिषद घेत पोलिस आयुक्तांनी उत्सव काळातील बंदोबस्ताची माहिती दिली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत फरासखाना, खडकी आणि विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाइन शॉप व परमिट रूम १० दिवस बंद ठेवण्याची सुचना समोर आली होती. तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. गणेश उत्सवाच्या काळात जिल्हा प्रशासनाने तीन दिवस मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे (ड्राय डे) आदेश दिले आहेत. प्रतिष्ठापना (७ सप्टेंबर), विसर्जन मिरवणूक (१७ सप्टेंबर) आणि मिरवणूक संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी (१८ सप्टेंबर) मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गर्दी, गैर प्रकारांवर शहरातील वेगवेगळ्या भागात लावलेले १ हजार ३५६ सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत. मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
गर्दी नियोजनासाठी वाहतूक पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गृहरक्षक दलाचे जवान, गुन्हे शाखेची पथके, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी असणार आहेत.
पुणे गणेशोत्सव काळात बंदोबस्तासाठी अपर पोलीस आयुक्त – ४, पोलीस उपायुक्त – १०, सहायक पोलिस आयुक्त – २३, पोलीस निरीक्षक -१२८, सहाय्यक पोलीस निरीक्षक – ५६८, पोलीस कर्मचारी - ४ हजार ६०४, होमगार्ड – ११००, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तसेच केंद्रीय सुरक्षा दल व शीघ्र कृती दलाच्या १० तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.