पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरातून मोरिया बोटीतून मारलेल्या ऐतिहासिक उडीचा देखावा पुण्यामध्ये टिळक रस्त्यावर ३० हजार बिस्किटे वापरून साकारण्यात आला आहे. बिस्किटांसह चॉकलेट आणि गोळ्यांचा वापर देखील यामध्ये करण्यात आला असून तो पाहण्याकरिता गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे.
ग्राहक पेठ सेवक गणेशोत्सव तर्फे हा देखावा साकारण्यात आला आहे. ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांच्या संकल्पनेतून हा देखावा तयार केला आहे. अध्यक्ष मनिष शिंदे, कार्याध्यक्ष भीमाशंकर मेरू, उपाध्यक्ष राजू बालेश्वर, खजिनदार दीपाली विंचू यांसह सजावट कलाकार प्रफुल्ल जाधवर, धर्मेश पिप्पलिया, उदय जोशी, शैलेश राणिम, चंदा येरवा, अर्चना भोकरे, संजय बनकर, रायबान आडेवार यांनी याकरिता परिश्रम घेतले आहेत. पारले जी कंपनीने याकरिता विशेष सहकार्य केले आहे.
सूर्यकांत पाठक म्हणाले, गेली अनेक वर्षे बिस्कीट व चॉकलेटचा देखावा साकारण्याची परंपरा ग्राहक पेठेने यंदाही कायम ठेवली आहे. लहान मुलांकरिता हा देखावा नेहमीच आकर्षण ठरतो. सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरातून मोरिया बोटीतून मारलेल्या ऐतिहासिक उडीने इतिहास रचला. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि सावरकरांविषयी संपूर्ण जगाला माहिती मिळाली. त्यामुळे यंदा देखील ३० हजार बिस्किटे, ५ ते ६ किलो गोळ्या व चॉकलेट वापरून हा देखावा साकारत सावरकरांना आदरांजली अर्पण करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदारातून मोरिया बोटीतून मारलेल्या ऐतिहासिक उडीचा बिस्कीट मधील देखावा पाहण्याकरिता गणेश भक्तांची गर्दी होत आहे.