मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Ganesh Festival : गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune Ganesh Festival : गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 17, 2022 04:22 PM IST

पुण्यात यंदा गणेशोत्सवात मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे मिळणार आहेत. तसेच ध्वनीमर्यादेत अतिरिक्त एक दिवस शिथिलता देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी आदी आगामी सण, उत्सव शांततेत, उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मंडळांना केले. उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, मोहरम तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ हून अधिक वर्षांची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव समाजजागृतीच्या उद्देशाने सुरू केले. ही परंपरा मंडळांनी सुरू ठेवावी. गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या सावटाखाली होतो, त्यामुळे आपले सण उत्साहाने साजरे करता आलेले नाहीत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दही हंडी आदी सण उत्साहाने, धुमधडाक्यात साजरे व्हावेत यासाठी राज्य शासनामार्फत गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करण्यात येईल.

कोविडमध्ये गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीने चांगले काम केले आहे. आगामी गणेशोत्सवातही उत्कृष्ट काम करावे, कोरोनाबाबत चांगली जनजागृती करावी. गोविंदा उत्सवही चांगल्याप्रकारे साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

गणेशोत्सवात रात्री १० पर्यंतच्या ध्वनीमर्यादेला आता पाच दिवसांची सवलत

गणेशोत्सव कालावधीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी ध्वनीमर्यादेला ४ दिवसांची सवलत दिली होती. गणेश मंडळांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यामध्ये एक दिवसाची वाढ करण्याचे आदेश दिले. राज्य शासनाने गणेश मूर्तींबाबतचे निर्बंध काढून टाकल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. विविध परवानग्याही एक‍ खिडकी पद्धतीने देण्यात याव्यात. मनपाने मंडप टाकण्यासाठीचे शुल्क मंडळांकडून घेऊ नये. वीज मंडळांना तात्पुरते वीजजोड देण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी असे सांगून परवानग्यांसाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांना चकरा माराव्या लागू नये याची काळजी घ्यावी असेही निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

IPL_Entry_Point