Pune Ganpati visarjan traffic update : पुण्याच्या वैभवी गणेशोत्सवाची सांगता उद्या मंगळवारी होणार आहे. या साठी मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरून उद्या मिरवणुका निघणार असल्याने पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक उपयुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे. उद्या शहरातील विसर्जन मार्गासह मध्यभागातील प्रमुख रस्ते व इतर १७ रस्ते वाहतूकीसाठी बंद राहणार आहे. तर काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकितील हे बदल पाहून घराबाहेर पडण्याचे नियोजन करा असे आवाहन करण्यात आले आहे. मिरवणूक संपेपपर्यंत हे रस्ते बंद राहणार आहेत.
पुण्यातील १० दिवसांच्या गणपती उत्सवाची मंगळवारी सांगता होणार आहे. मंगळवारी सकाळपासून विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, गणेश रोड, केळकर रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रोड़, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रोड, बगाडे रोड, गुरू नानक रोड या रस्त्यावरील वाहतूक विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे. तर जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक, शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलीयार रस्त्यावरील दारूवाला पुल, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर पोलीस चौकी, सोलापूर रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौक, सातारा रस्त्यावरील व्होल्गा चौक, बाजीराव रस्त्यावरील वीर सावरकर पुतळा चौक, लाल बहादूर शास्त्री रोडवरील सेनादत्त पोलीस चौकी, कर्वे रोडवरील नळस्टॉप, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गुडलक चौकातून वाहतूक वळवण्यात आली आहे.
लक्ष्मी रोड, केळकर, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, टिळक रोड, शिवाजी रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रस्ता, कर्वे रोड, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर नो पार्किंग करण्यात आले असून. खंडोजीबाबा चौक ते हॉटेल वैशाली यांना जोडणाऱ्या उपरस्त्यांच्या १०० मीटर परिसरात वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
गणेश विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री १२ ते बुधवारी (दि.१८) रात्री बारापर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. ही वाहने शहराबाहेरून वळवण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणूकवेळी पुण्यातील अनेक मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी वर्तुळाकार मार्ग तयार करण्यात आला आहे. कर्वे रोड- नळस्टॉप चौक - लॉ कॉलेज रोड सेनापती बापट रोड जंक्शन-गणेशखिंड रोड सिमला ऑफिस चौक-संचेती हॉस्पीटल चौक-इंजि. कॉलेज चौक-आंबेडकर रोडवरील शाहिर अमर शेख चौक- मालधक्का चौक- बोल्हाई चौक-नरपतगिरी चौक-नेहरु रोडवरुन संतकबीर पोलीस चौकी सेव्हन लव्हज चौक वखार महामंडळ चौक-शिवनेरी रोडवरुन गुलटेकडी मार्केटयार्ड मार्केटयार्ड जंक्शन सातारा रोडने व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण सिनेमा) - सिंहगड रोडने मित्रमंडळ चौक- सावरकर चौक सिंहगड रोड जंक्शन-लाल बहादुर शास्त्री रोडने सेनादत्त पोलीस चौकी, अनंत कान्हेरे पथावरुन म्हात्रे पुल ते नळस्टॉप या मार्गाचा वापर वाहन चालकांना करता येणार आहे.