Pune Hadapsar murder : पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. हडपसर येथे काही मित्रांनी मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी याची माहिती मित्राला देत ही हत्या केली आहे. आपल्या व्यसनाबद्दल आई आणि पत्नीस भडकवत असल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी बहिणीने तक्रार दिली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली.
अमोल उर्फ भावड्या मारुती माने (वय ३९, रा. रामोशी आळी, हडपसर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी बहीण संगीता कुलकर्णी (वय ५३, रा. सदाशिव पेठ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तर वैभव गणेश लबडे (वय ३१, रा. हिंगणे आळी, हडपसर) व ज्ञानेश्वर दत्तू सकट (वय २७, रा. रामोशी आळी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री पावणेअकरा ते गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान हडपसरमधील रामोशी आळीतील नवचैतन्य चौकाशेजारी घडली.
खून झालेला अमोल माने हा घरी एकटा राहून केटरिंगचे काम करत होता. आरोपी व माने हे चांगले मित्र होते. त्यांना दारूचे व्यसन होते. अमोल हा वैभवच्या व्यसनाविषयी त्याच्या आई व पत्नीला वारंवार सांगत असतं. त्यामुळे आरोपी वैभवचे आई व पत्नीशी सारखे वाद होत होते. अमोलने आई व पत्नीला भडकावले असल्याचा राग वैभवला होता. दरम्यान, गुरुवारी रात्री वैभव, व ज्ञानेश्वरने दारू प्यायली. दारूच्या नशेत वरील कारणावरून वैभव व अमोल यांच्यात मोठे वाद झाले. याच वादात व दारूच्या नशेत वैभवने अमोलच्या बहिणीला फोन करत ‘अक्का, तू माझ्या आईसारखी आहे. पण, अमोल मला शिव्या देत असून, मी त्याला मारणार. मला तुरुंगात जावे लागले तरी चालेल,’ अशी धमकी दिली. तर अमोलने बहिणीला फोन करत वैभव मला मारेल असे वाटते का, असे म्हणत फोन कट केला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी बहिणीने अमोलला फोन करून देखील त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने अमोलच्या दुसऱ्या मित्राला त्याच्या घरी पाठवले. मित्राने त्याच्या घराचा दरवाजा उघडताच त्याला मोठा धक्का बसला. अमोल हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसले. याची माहिती हडपर पोलिसांना देण्यात आली आली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. त्याचा मृतदेह ससुन रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, फरार वैभव व ज्ञानेश्वर यांना पोलिसांनी सीसीटीव्ही व इतर माहितीच्या आधारे सोलापूर येथून अटक केली. त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.