Tamhini Ghat : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! ताम्हीणी अभयारण्यात पावसाळी पर्यटनाला वनविभागाने घातली बंदी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Tamhini Ghat : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! ताम्हीणी अभयारण्यात पावसाळी पर्यटनाला वनविभागाने घातली बंदी

Tamhini Ghat : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! ताम्हीणी अभयारण्यात पावसाळी पर्यटनाला वनविभागाने घातली बंदी

Jun 30, 2024 04:04 PM IST

Tamhini Ghat news : ताम्हीणी घाटात दोन पर्यटकांच्या मृत्यूनंतर पुणे वन विभागाने ताम्हिणी अभयारण्य क्षेत्रात ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.

पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! ताम्हीनी अभयारण्यात पावसाळी पर्यटनाला वनविभागाने  घातली बंदी
पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! ताम्हीनी अभयारण्यात पावसाळी पर्यटनाला वनविभागाने घातली बंदी

Tamhini Ghat news : पुण्यात सध्या घाट विभागात पावसाचा जोर वाढला आहे. वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पुण्यातील घाट विभागात फिरण्यासाठी जात असतात.  पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचे आवडते ठिकाणी म्हणजे ताम्हीणी घाट असून  मोठ्या प्रमाणात पर्यटक ताम्हीणी घाटाला भेट देत असतात. शनिवारी आणि रविवारी या घाटात पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, हा घाट अपघातप्रवण असल्याने आणि गेल्या काही दिवसांत दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत हा घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती, उपवनसंरक्षक (वन्यजीव) तूषार चव्हाण यांनी दिली आहे.

ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यातील प्लस व्हॅलीमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या व्हॅलीत पावसामुळे रस्ते हे निसरडे झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होऊ शकतो. या जीवघेण्या अपघातांची शक्यता लक्षात घेऊन वन्यजीव विभागाने अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या घाटात जून महिन्यात मिल्की बार धबधब्यावर पाण्याच्या खोलीचा अंदाज आल्याने दोन पर्यटकांचा मृत्यू झाला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर २७ जून रोजी आणखी एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता.

या बाबत माहिती देतांना पुणे विभागाचे उपवनसंरक्षक (वन्यजीव) तुषार चव्हाण म्हणाले, पावसाळ्यात प्लस व्हॅली आणि ताम्हीणी वनक्षेत्रातील रस्ते निसरडे होतात. आल्हाददायक हवामान, नैसर्गिक देखावे आणि धबधबे यासाठी पर्यटक अनेकदा या ठिकाणांना भेट देतात. काही उत्साही पर्यटक धबधब्यावर असलेल्या छोट्या नैसर्गिक तलावांमध्येही उतरतात. मात्र, पावसाळ्यात तलावांची खोली वाढते आणि पाणी वाढून जीवघेण्या घटना घडतात. त्यामुळे या घाटात ट्रेल मार्गाने वनक्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांवर भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार कारवाई करण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले. वन्यजीव विभागामार्फत निसर्गवाटा २८ जून २०२४ ते ३० जून २०२४ पर्यं पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या असेही चव्हाण म्हणाले.

या घाटात येणाऱ्या पर्यटकांनी वर्षा पर्यटनावेळी वनविभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. जर हे पालन केले नाही तर संबंधित पर्यटकांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे देखील चव्हाण म्हणाले.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर