राज्यात गणेशविसर्जनाची धूम असून मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाला निरोप दिला जाता आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूरसह राज्यातील प्रमुख शहारांमध्ये रात्री उशिरापर्यंत विसर्जना मिरवणुका सुरू आहेत. अशातच पुणे व कोल्हापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात पुन्हा गोळीबार झाला असून अचानक झालेल्या घटनेमुळे नागरिक घाबरले. त्यासोबतच पोलिसांचीही धावपळ झाली. पिंपरी चिंचवडमध्ये मुंबई- बंगळुरु हायवे लगत असलेल्या फिनिक्स मॉलच्या गेट नंबर ८ वर अज्ञात व्यक्तीन हवेत गोळीबार केलाय. तर गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असतानाच कोल्हापुरात एकाची हत्या करण्यात आल्यानं खळबळ माजली आहे.
कोल्हापूरच्या मटण मार्केटजवळ हत्येची घटना घटली आहे. खाटीक मंडईजवळ हातगाडी लावण्याच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी अवस्थेत तरुणाला सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. इम्रान इमाम मुजावर (वय ३२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हातगाडी लावण्यावरून इम्रान इमाम मुजावर यांचा यूसुफ अलमसजीत याच्याबरोबर वाद झाला. या वादातून आरोपीने इम्रानवर चाकू हल्ला केला. शहरातील आराम कॉर्नर भागात ही घटना घडली. याप्रकरणी संशयीत आरोपी यूसुफ अलमसजीत याला राजावाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान पुण्यामध्ये पुन्हा गोळीबाराची घटना समोर आली आहे. गणपती विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच गोळीबाराची घटना घडल्याने नागरिक घाबरले असून पोलिसांचीही पळापळ झाली. पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात फिनिक्स मॉलजवळ हा गोळीबार करण्यात आला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर फरार झाला आहे. पुण्यात गेल्या आठवड्यामध्य सलग तीन दिवस गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. आज गणपती बाप्पाला निरोप दिला जात असताना पुणे गोळीबाराच्या घटनेने पुन्हा हादरलं. राज्यभरात ढोल ताशांच्या गजरात तसेच मोठ्या धुमधडाक्यात बाप्पाची मिरवणूक काढून गणेश विसर्जन केले जात आहे. पुण्यातही विसर्जनानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत. गर्दीच्या वेळी गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी- चिंचवडमध्ये १३ सप्टेंबरला काळेवाडीमधील नडेनगरमध्येही गोळीबाराची घटना घडली होती. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विनोद नढे आणि त्यांचे भाऊ सचिन नढे यांनी एका बारमध्ये गोळीबार केला होता.