कामाच्या अतिताणामुळे पुण्यातील ई. वाय. कंपनीतील तरुणीचा मृत्यू; आईने बॉसला धरलं जबाबदार; पत्र व्हायरल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कामाच्या अतिताणामुळे पुण्यातील ई. वाय. कंपनीतील तरुणीचा मृत्यू; आईने बॉसला धरलं जबाबदार; पत्र व्हायरल

कामाच्या अतिताणामुळे पुण्यातील ई. वाय. कंपनीतील तरुणीचा मृत्यू; आईने बॉसला धरलं जबाबदार; पत्र व्हायरल

Updated Sep 19, 2024 09:16 AM IST

pune ey employee dies : पुण्यात एका बड्या कंपनीतील २६ वर्षीय तरुणीचा हृदय विकाराने मृत्यू झाला. या प्रकरणी महिलेच्या आईने कंपनीवर गंभीर आरोप केले असून कामाचा अतिताण असल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 कामाच्या अतिताणामुळेच पुण्यातील ई. वाय. कंपनीतील तरुणीचा मृत्यू? आईने बॉसला धरलं जबाबदार; पत्र व्हायरल
कामाच्या अतिताणामुळेच पुण्यातील ई. वाय. कंपनीतील तरुणीचा मृत्यू? आईने बॉसला धरलं जबाबदार; पत्र व्हायरल

Pune EY employee dies : कामाच्या अतितानामुळे एका २६ वर्षीय मुलीचा हृदय विकाराने मृत्यू झाल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. कंपनीतील वरिष्ठांनी तिला सातत्याने दिलेल्या अतिरिक्त कामाच्या तानामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. तिच्या आईने कंपनीच्या सीईओंना लिहिलेले पत्र सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले असून अनेक नेटकऱ्यांनी कंपनीच्या धोरणांवर देखील टीका केली आहे.

अ‍ॅना सेबेस्टियन पेरायिल (वय २६) असं हृदय विकारामुळे निधन झालेल्या तरुणीचे नाव आहे. अ‍ॅना सेबेस्टियनच्या आई अनीता ऑगस्टीन यांनी ती काम करत असलेल्या ई. वाय. इंडिया कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांना एक पत्र लिहित अनेक आरोप केले आहे. त्यांनी त्यांच्या पत्रातून मेमानी यांना त्यांच्या मुलीला न्याय मिळायला हवा व ई. वाय. इंडिया कंपनीत बदल करण्याची गरज देखील व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण ?

अ‍ॅना सेबेस्टियन पेरायिल या सीए असून त्या पुण्यातील ईवाय या कंपनीत काम करत होत्या. त्यांच्या आईने आरोप केला आहे की “तिचे कार्यालयातील वरिष्ठ तिला कामाचा लोड द्यायचे. अ‍ॅना ही गेल्या काही दिवसांपासून खूप तणावात होती. तिच्यावर कामाचं प्रेशर टाकलं जात असल्याने आमची लेक मरण पावली असल्याचं अ‍ॅनाच्या आईने म्हटले आहे. या तरुणीने मार्च २०२४ मध्ये ईवाय पुणे या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. तर जुलै महिन्यात तिचं निधन झालं. तिच्या आईने लिहिलेल्या भावूक पत्रामुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आहे.

अनीता यांनी पत्रात लिहिलं आहे की “मी एक दुखी व पीडित आई म्हणून हे पत्र लिहित आहे. माझी मुलगी कंपनीच्या धोरणामुळे मी गमावली आहे. माझी मुलगी १९ मार्च २०२४ रोजी तुमची कंपनी ई. वाय. इंडियामध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाली होती. चार महिन्यांनंतर २० जुलै रोजी माझी लाडकी लेक कामाच्या अति तानामुळे या जगातून निघून गेली. कामाचं ओझं, नवीन वातावरण व कामाचे जास्तीचे तास यामुळे अ‍ॅना ही शरिराने व मनाने थकली होती. यामुळे तिला चिंता, निद्रानाश व तणाव हे आजार देखील जडले. कामाच्या वर्क प्रेशरमुळे ती खचली होती. कठोर परिश्रम व चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली मानून ती काम करत होती. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तिच्या या गोष्टीचा फायदा घेत तिच्यावर कामाचा अधिक ताण दिला. ज्या टीममध्ये काम करत होती तिथे कामाचं खूप प्रेशर होतं. त्यामुळे अनेकांनी राजीनामा देखील दिला आहे. अ‍ॅनाचे टीम लीडर तिला प्रोत्साहित करून तिला सातत्याने काम देत राहिले. यामुळे तिला विश्रांती मिळत नव्हती. रात्री उशिरापर्यंत ती काम करत राहायची. सुट्टीच्या दिवशी देखील तिला कामं दिलं जात होतं. ज्यांनी तिला काम दिलं ते तिच्या अंत्यविधीला देखील आले नव्हते.

अ‍ॅनाला ६ जुलै छातीत दुखत होत. त्यामुळे तिला पुण्यातील एका रुग्णालयात नेण्यात आलं. त्या ठिकाणी तिला ईसीजी करून तिची तपासणी करून, प्राथमिक उपचार तसेच औषधं देऊन घरी पाठवले. मात्र तिला कामाचा खूप त्रास होत असल्याने टीची झोप पूर्ण होत नव्हती असे डॉक्टरांनी तिच्या आई वडिलांना सांगितलं. तिला आराम करण्यास सांगूनही हॉस्पिटलमधून अ‍ॅना थेट ऑफिसला गेली व रात्री उशिरा काम करून घरी आली. यानंतर तिची प्रकृती आणखी खराब झाली. असे असतांना ती काम करत राहिली आणि तिचा दोन आठवड्यांनी मृत्यू झाला.

आईच्या पत्राला कंपनीने उत्तर दिले आहे. अ‍ॅना ही कंपनीची चांगली कर्मचारी होती. तिच्या जण्याने तिच्या कुटुंबासोबत सर्वांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. कुटुंबाने अनुभवलेल्या नुकसानीची भरपाई कोणत्याही उपायाने होऊ शकत नसली तरी, अशा संकटाच्या वेळी आम्ही नेहमीप्रमाणे सर्व मदत केली आहे आणि यापुढेही करत राहू. आम्ही कुटुंबाचा पत्रव्यवहार अत्यंत गांभीर्याने घेतला असून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देतो असे देखील कंपनीने म्हटलं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर