Traffic update : पुणे मेट्रोच्या कामासाठी व या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे विद्यापीठ ते सिमला चौक मार्गावर एकेरी वाहतूक करण्यात आली होती व येथील वाहतूक ही विविध पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. त्यामुळे पुणे विद्यापीठ मार्गे सिमला चौकात थेट जाता येत नव्हते. मात्र, आता या मार्गावरील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी या मार्गावर पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या बाबत वाहतूक पोलिस उप आयुक्त रोहिदास पवार यांनी माहिती दिली आहे.
पुणे विद्यापीत गणेशकहीनड मार्गावर वाहतूककोंडी ही नित्याची बाब आहे. या ट्रॅफिक पासून पुणेकरांना दिलासा मिळावा यासाठी विविध उपाय योजना करण्यात आल्या. मात्र, येथील कोंडी काही सुटू शकली नव्हती. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतुकीचा पर्याय राबवण्यात आला होता.
या मार्गावर मेट्रोचे बांधकाम सुरू आहे. यामुळे देखील वाहतूक कोंडी होत होती. या मार्गावर प्रवास नको रे बाबा असे सर्व सामान्य पुणेकर म्हणत होते. १ कोलोमीटर अंतर कापण्यासाठी दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत होते. यामुळे या मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी पुणे वाहतूक शाखेकडून या मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले होते. १ जून पासून पुणे विद्यापीठ चौकामधून, रेंजहिल्स चौकापासून पुढे शिवाजीनगरकडे येण्यासाठी गणेशखिंड रोडवरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. यामुळे वाहन चालकांना वळून पुढे जावे लागत होते. मात्र, या मार्गावरील वाहतुकीत आता पुन्हा बदल करण्यात आला आहे. यामुळे वाहनचालकांचा वेळ देखील वाचणार आहे.
पुणे विद्यापीठ ते सिमला चौक मार्ग हा पुण्यातील महत्वाचा मार्ग आहे. हा मार्ग पाषाण, बानेर औंधला जोडतो. तसेच मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी देखील या मार्गांचा प्रामुख्याने वापर होतो. शिवाय हिंजवडी येथे कामासाठी जाणाऱ्या आयटी अभियंत्यांची संख्या देखील मोठी आहे. मात्र, या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक वैतागले होते. या मार्गावर राजभवन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, कॉसमॉस टॉवर, ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स, राहुल टॉकिज, मोदीबाग, एलआयसी, सवाई गंधर्व स्मारक, पॉलिटेक्निक कॉलेज, कृषी महाविद्यालय, आकाशवाणी, आदि महत्वाचे ऑफिस देखील आहेत. येथे जाणाऱ्यांना ट्रॅफिकमुळे वैताग यायचा. आता या मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याने या मार्गावरील कोंडी सुटणार का ? हे पहावे लागणार आहे.