जुन्नरमध्ये 'दादा' फक्त शरद सोनवणे! प्रस्थापित उमेदवारांना टक्कर देऊन कसं जुळवलं विजयाचं गणित?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जुन्नरमध्ये 'दादा' फक्त शरद सोनवणे! प्रस्थापित उमेदवारांना टक्कर देऊन कसं जुळवलं विजयाचं गणित?

जुन्नरमध्ये 'दादा' फक्त शरद सोनवणे! प्रस्थापित उमेदवारांना टक्कर देऊन कसं जुळवलं विजयाचं गणित?

Nov 26, 2024 09:18 AM IST

Pune Junnar Assembly Election Result: पुणे जिल्ह्यात अनेक धक्कादायक निकाल लागले. यातील महत्वाचा निकाल म्हणणे शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्याचा. यात अपक्ष उमेदवार शरद सोनवणे निवडून आले आहेत.

जुन्नरमध्ये फक्त एकच दादा शरददादा..! शरद सोनवणे ठरले जिल्ह्यातील एकमेव अपक्ष विजयी उमेदवार
जुन्नरमध्ये फक्त एकच दादा शरददादा..! शरद सोनवणे ठरले जिल्ह्यातील एकमेव अपक्ष विजयी उमेदवार

Pune Junnar Assembly Election Result: राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीने मोठं यश मिळवलं आहे. पुण्यातील २१ मतदार संघांपैकी १९ ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात मात्र, कोणताच फॅक्टर चालला नाही. या ठिकाणी अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी दिग्गज अतुल बेनके आणि सत्यशील शेरकर यांचा पराभव करत निवडणुकीत यश मिळवलं आहे. सोनवणे जिंकल्याची बातमी येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मुंबईत पाचारण केलं असून त्यांच्यासाठी खास हेलिकॉप्टर देखील पाठवलं. यामुळे ते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

जुन्नर मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील महत्वाचा मतदार संघ आहे. परंपरेने हा मतदारसंघ शिवसेनेचा गड राहिला आहे. मात्र, गेल्या दोन निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेची जादू चालली नाही. २०१४ मध्ये मनसेच्या तिकीटावर शरद सोनवणे हे आमदार म्हणून निवडून आले. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अतुल बेणके या ठिकाणी निवडून आले होते. या पूर्वी त्यांचे वडील वल्लभ बेनके हे आमदार राहिले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडल्यावर शरद पवार व अजित पवार हे दोन गट पडले. अजित पवार यांच्याकडून अतुल बेणके तर शरद पवार गटाकदुन विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे शिंदे गटाकडे असलेले शरद सोनवणे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांनी थेट अपक्ष अर्ज भरत निवडणुकी रिंगणात उडी मारली. शरद सोनवणे यांनी जुन्नर विधानसभा मतदार संघात सत्ताधारी महायुती, विरोधी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करत ६ हजार ६६४ मतांनी आणि स्टार प्रचारकांशिवाय विजय मिळवला.

राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्यासाठी शरद पवार, डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार करण्यात आला. तर राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल बेनके यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेकोर नियोजन केले होते. मात्र, शरद सोनवणे यांना कोणत्याही स्टार प्रचारकांच्या पाठिंब्याशिवाय स्वबळावर विजय मिळता. तळागाळापर्यंत त्यांचा असलेला संपर्क व जुन्या शिवसैनिकांचा पाठिंबा मिळवण्यात यश आल्याने छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या जुन्नरची विधानसभा मतदार संघात सोनवणे यांना बाजी मारता आली.

व्हायरल क्लिपचा परिमाण नाही

सोनवणे यांना ७३ हजार ३५५, तर शेरकर यांना ६६ हजार ६९१ मते मिळाली. तर अतुल बेनके यांना ४८,१०० मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देवराम लांडे यांना २२ हजार ४०१ मते मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारणार, जुन्नरच्या विकासासाठी पाच हजार कोटींचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करणे यासह सोनवणे यांनी दिलेल्या महत्त्वाच्या आश्वासनांचा त्यांच्या विजयात मोलाचा वाटा होता. मात्र, निवडणुकीच्या तीन दिवस आधी सोनवणे यांचा अश्लील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर समोर आला आणि नारायणगाव आणि जुन्नरमधील व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरू लागल्याने या मतदारसंघांमध्ये खळबळ उडाली होती. सोनवणे यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला असला तरी सर्वांनाच धक्का बसला होता. जुन्नरमध्ये झालेल्या चौफेर लढतीमुळे मतांची लक्षणीय विभागणी झाली आणि त्याचा फायदा सोनवणे यांना झाला.

विजयानंतर सोनवणे यांनी जुन्नरच्या जनतेचे आभार मानत हा विजय सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाचे फलित असल्याचे सांगितले. धनाढ्य विरोधकांनी पैशाच्या जोरावर निवडणुकीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करूनही जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला. जुन्नरला पर्यटन केंद्र बनविण्यासाठी आणि त्याच्या विकासासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या डीपीआरची अंमलबजावणी करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे सोनवणे म्हणाले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सोनवणे यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल वल्लभ बेनके यांनी त्यांना पराभूत केले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सोनवणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर विजयी झालेले एकमेव उमेदवार होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपली ताकत दाखवून देत विजय मिळवला आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर