Malnutrition In Pune District : राज्यात पुणे जिल्हा प्रगतिशील समजला जातो. मात्र, या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कुपोषित मुलं आढळली आहेत. गेल्या महिन्यात जिल्ह्यात कुपोषित बालके शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. यात ५५१ कुपोषित बालके आढळले असून यातील ७२ बालके ही तीव्र कुपोषित असल्याचं निष्पन्न झालं आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत त्यांना पोषित गटात आणण्यासाठी पावले उचलली जात असून या सर्व बालकांना ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये ठेवण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे ग्रामीण भागात कुपोष्णाचे प्रमाण कमी झाले होते. दरम्यान, कुपोषित बालकांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. यात शून्य ते सहा वयोगटातील काही मुले ही कुपोषित असल्याचे आढळले आहे. मुलांमधील कुपोषण कमी करण्यासाठी त्यांना सकस आहार दिला जाणार आहे. या मुलांच्या पोषणासाठी अंगणवाडी सेविकांना आगाऊ स्वरूपात जिल्हा परिषदेकडून निधी देखील दिला जाणार आहे. गेल्या महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ५५१ कुपोषित बालके आढळून आली असून यातील ७२ बालके ही अतितीव्र कुपोषित असल्याचे तर तर ४८० बालके ही मध्यम कुपोषित असल्याचे आढळले आहेत. या सर्व बालकांना ग्राम बालविकास केंद्रात दाखल करून त्यांना आहार आणि औषधोपचार करण्यात येणार आहे.
या केंद्रामध्ये बालकांना आठ वेळा पौष्टिक आहार व आवश्यक औषधे देण्यात येतात. कुपोषित बालकांना दैनंदिन आहार, औषधे आणि त्यांचे दररोज मॉनिटरिंग केले जाते. याशिवाय शनिवारी व रविवारी या सुटीच्या दिवशीही तालुक्यातील अधिकाऱ्यांना दुसऱ्या तालुक्यात जाऊन प्रत्यक्षात पाहणीची जबाबदारी देण्यात येते. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार केले जातात.
जिल्ह्यात पुर्वी हजारांच्या घरात कुपोषित बालके आढळून येत होती. मात्र, हे प्रमाणात कमी झाले आहे. यावेळी ५५२ कुपोषित बालके आढळून आली असून ग्राम बालविकास केंद्रांमध्ये प्रत्येक अंगणवाडी सेविका, तालुक्यातील अधिकारी तसेच डॉक्टर यांनी चांगले काम केले. म्हणून कुपोषणाच्या संख्येत घट झाली आहे. सर्वेक्षणात आढळलेल्या बालकांवरही ग्राम बालविकास केंद्राद्वारे उपचार करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिली.
तालुका तीव्र कुपोषित मध्यम कुपोषित
आंबेगाव ५ २३
मंचर ६ १९
बारामती ६ १४
भोर ४ ५
दौंड ५ ४३
हवेली २ २
उरुळीकांचन ४ १९
इंदापूर १३ ८९
जुन्नर १० ७८
खेड २ ७०
मावळ ४ २८
मुळशी २ १७
नारायणगाव २ ३
पुरंदर १ २३
शिरुर ३ २७
वेल्हा ३ २०
एकूण ७२ ४८०
संबंधित बातम्या