Pune Swarget rape case : स्वारगेट एसटी आगार बलात्कार प्रकरणी आरोपीने तरुणीने पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे तिने आरडा ओरडा केला नसल्याच्या युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला आहे. मात्र, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीने जीवाच्या भीतीने आरडा ओरडा केला नसल्याचे समोर आले आहे. आरोपीने तरुणीचा गळा दाबला व तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तरुणीने आपल्याला जिवंत सोडावे, यासाठी तरुणीने आरोपी दत्तात्रय गाडे याच्याकडे याचना केली. याचाच फायदा घेऊन दत्तात्रय गाडे याने तरुणीवर अत्याचार केले.
दत्तात्रय गाडे याने तरुणीने तिच्या मर्जीने आपल्याशी शरीरसंबंध ठेवल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात ही तरुणी जीवाच्या भीतीने गप्प राहिली व तिने आरडाओरडा केला नसल्याचे समोर आले आहे. अत्याचारावेळी दत्तात्रय गाडेने तिला जिवंत सोडावे, यासाठी तिने प्रतिकार केला नाही. दत्तात्रय गाडेने कंडक्टर असल्याचे सांगत शिवशाही बसमध्ये तरुणीला नेल्यावर त्याने बसचा मुख्य दरवाजा व चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजा बंद केला. त्यानंतर पीडितेने बसमध्ये कोणीच नसल्याचे पाहून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडेने तिला सीटवर ढकलून दिले. यावेळी पिडीत तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, बसच्या काचा बंद होत्या. यामुळे आवाज बाहेर गेला नाही. दरम्यान, दत्तात्रय गाडेने पीडितेचा गळा दाबला. त्यामुळे ही तरुणी प्रचंड घाबरली. आपल्याला जिवंत सोडावे, यासाठी ही तरुणी दत्तात्रय गाडे याच्याकडे याचना करु लागली. मात्र, आरोपी गाडेने याचा फायदा घेऊन तरुणीवर दोन वेळा अत्याचार केले. या प्रकरणी आरोपीला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात ड्रोन आणि स्निफर डॉगच्या साहाय्याने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या व्यापक शोध मोहिमेनंतर आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला एका शेतातून पकडण्यात आले. त्याला अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोळे यांच्या पुणे सत्र न्यायालयात कडक पोलिस बंदोबस्तात हजर करण्यात आले. आरोपीचे वकील वाजिद खान यांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांच्या क्लायंटवर मीडिया ट्रायल सुरू आहे आणि तरुणी ही स्वत: बसमध्ये गेली होती व तिने या साठी पैसे घेतले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये महिलेने स्वत: दरवाजा उघडून बसमध्ये पाऊल ठेवले आणि नंतर बाहेर आल्याचे दिसत आहे. परस्पर संमतीने त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले,' असे खान यांनी न्यायालयाला सांगितले.
तपास अधिकारी व निरीक्षक युवराज नांदे यांनी न्यायालयात रिमांड अर्ज सादर करून गाडे यांना १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. गाडे यांनी पीडितेवर दोनवेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती सरकारी वकील भाग्यश्री संचेती-डगळे व नाद्रे यांनी न्यायालयाला दिली. सुरक्षिततेच्या भीतीने ही महिला साताऱ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये चढली. त्यानंतर तिने हडपसर येथे उतरून मित्राला फोन केला आणि अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली.
आरोपींनी मंगळवारी सकाळी स्वारगेट टर्मिनस येथे २६ वर्षीय पीडितेला 'दीदी' असे संबोधून आगाराच्या आवारात उभ्या असलेल्या रिकाम्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अर्धा डझन गुन्हे दाखल असलेले गाडे घटनेच्या दिवशी बस टर्मिनसच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. तो वापरत असलेल्या मोबाइलफोनचा डेटा अद्याप सापडलेला नाही, अशी माहिती त्यांनी न्यायालयाला दिली. गाडे यांच्याविरोधात दाखल झालेल्या अर्धा डझन गुन्ह्यांपैकी पाच गुन्ह्यांमध्ये महिला तक्रारदार असल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर गाडे यांना १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयाच्या आवारात १०० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेनेच्या सदस्यांनी न्यायालयाच्या गेट क्रमांक चारबाहेर निदर्शने केली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेले.
संबंधित बातम्या