पुण्यात आठवड्याभरात अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत. बाणेर परिसरात एका सराफ व्यावसायिकाने दुकान मालकावर गोळ्या झाडून नंतर स्वत:वर गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुणे शहरातील आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन तरुणांनी एका महिलेचा भरदिवसा खून केला.
या हत्येचा थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. वर्षा थोरात असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले यांनी अटक करण्यात आले आहे.
बुधवार पेठेत भरदिवसा झालेल्या या हत्येचा थरार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. गेल्या तीन दिवसातील शहरातील ही दुसरी हत्या आहे. वर्षा थोरात या महिलेने मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन तरुणांनी तिला बेदम मारहाण केली. तिच्या डोक्यात वर्मी घाव लागून तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत वर्षा थोरातला दारूचे व्यसन होते. ती परिसरात फिरत असायची. आरोपी अब्दुल सय्यद याचा बुधवार पेठेत अंडा भूर्जीचा गाडा आहे. १०-१२ दिवसांपूर्वी अब्दुल याचा मोबाईल चोरीला गेला होता. हा मोबाईल वर्षा थोरातने चोरल्याचा त्याला संशय होता. या संशयातून त्याने व त्याचा मित्र गौरवने तिच्याकडे मोबाईलबाबत विचारणा केली.
यावरून त्यांच्यात वादावादी झाली. रागाच्या भरात आरोपींनी वर्षाच्या डोक्यात काठीने मारहाण केली. घाव वर्मी बसल्याने थोरात खाली कोसळली. तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याबाबत फरासखाना पोलिसांत गुन्हा नोंद असून पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
संबंधित बातम्या