Pune sinhgad Crime News : पुण्यातील सिंहगड परिसरातील महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या तरुणाच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं आहे. यात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तीन मित्र महिन्याभरापूर्वी मेटलच्या तारा चोरण्यासाठी एका १०० फुटांच्या टॉवरवर चढले. मात्र, त्यातील एकाचा खाली पडून मृत्यू झाला. यानंतर या घटनेची माहिती मित्राच्या कुटुंबीयांना व पोलिसांना न देता त्याच्या इतर दोन मित्रांनी त्याचा मृतदेह हा जंगलात पुरला. पोलिसांनी त्याच्या दोन मित्रांना अटक केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसवराज मंगरुळे (वय २२, रा. सिंहगड रोड) असे टॉवरवरून पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सौरभ रेणुसे आणि रूपेश येनपुरे या दोघांनी त्याचा मृतदेह जमिनीत पुरला. दोघांवर सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचे वृत्त असे की, बसवराज मंगरुळे, सौरभ रेणुसे आणि रूपेश येनपुरे हे तिघे १३ जुलै रोजी वेल्हे तालुक्यातील रांजणे गावाजवळील बंद हाय टेंशन टॉवरमधून मेटल केबल चोरण्याच्या उद्देशाने गेले. होते. हा टॉवर तब्बल १०० फुट उंच आहे. तिघेही या टॉवरवर चढले. मात्र, मेटल केबल काढण्याच्या प्रयत्नात असताना बसवराज मंगरूळे हा १०० फुट अंतरावरुन थेट खाली कोसळला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या सौरभ रेणुसे आणि रूपेश येनपुरे या दोघांनी बसवराजचा मृतदेह पाबे घाट परिसरातील जंगलात नेला. व खड्डा खोडून त्याचा मृतदेह गाडला. या घटनेची माहिती त्यांनी ना पोलिसांना दिली ना बसवराजच्या कुटुंबीयांना दिली.
या बाबत पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार बसवराजच्या कुटुंबीयांनी २३ जुलै रोजी पोलिसांत तक्रार दिली. यानंतर वेल्हा पोलिसांनी व पुणे पोलिसांनी यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी तपास करत असतांना हे तिघे मित्र वेल्हा तालुक्यातील रांजणे गावात धातूची केबल चोरण्यासाठी गेले होते. या दरम्यान, १०० फुट टॉवर वरून पडल्याने बसवराजचा मृत्यू झाला. पोलिसांना याची माहिती झाल्यावर त्यांनी दोघांना मृतदेह नेमका कुठे पुरला याची माहिती विचारली. यानंतर आरोपींनी पोलिसांना पाबे घाटात नेत मृतदेह पुरलेले ठिकाण दाखवले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.